वाहनचालकांना त्रास : वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : स्थानिक बजाज चौकात रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा तयार झाला आहे. परिणामी, वाहन चालकांना नाहक त्रास सहन करत येथून पुढील प्रवास करावा लागत आहे. सदर खड्डा तातडीने बुजविणे क्रमप्राप्त असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने मोठ्या अपघाताची भीती बळावत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देत खड्डा बुजविण्याची मागणी आहे. बजाज चौक भागातील आचार्य विनोबा भावे उड्डाणपूल वाहतुकीच्या दृष्टीने छोटा पडत होता. त्यामुळे सदर उड्डाणपुलाच्या रुंदीकरणाचे काम जिल्हा प्रशासनाने हाती घेतले आहे. परंतु, सदर काम कासवगतीनेच होत असल्याची शहरात ओरड आहे. त्यातच बजाज चौकात जीवघेणा खड्डा तयार झाल आहे. त्यामुळे भामटीपुरा चौकाकडून उड्डाणपुलाकडे, रेल्वे स्थानक व बसस्थानकाकडे जाणाऱ्या वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन पुढील प्रवास करावा लागत आहे. खड्डा चुकविण्याच्या नादात अनेक अपघात झाल्याची बरेच उदाहरणे आहेत. अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले आहे. बजाज चौकातील त्या खड्ड्यामुळे मोठ्या अपघाताची भीती बळावत असून याकडे लक्ष देत तात्काळ तो खड्डा बुजविण्याची मागणी आहे. बजाज चौकातील सदर खड्डा रात्रीला सहज दिसत नसल्याने मोठ्या अपघाताला निमंत्रण मिळत आहे. सुसाट पळविली जातात वाहने शिवाजी चौक ते बजाज चौक दरम्यानच्या रस्त्याचे सिमेंटीकरण करण्यात आल्यापासून हा मार्ग गुळगुळीत झाला आहे. या मार्गाने दिवसाला जड वाहनांना ये-जा करण्यास प्रतिबंध घालण्यात आले असले तरी दिवसाला मोठ्या प्रमाणात जड वाहने या मार्गाने ये-जा करताना दिसतात. बहुदा दुचाकीचालकासह जड वाहनचालक आपल्या ताब्यातील वाहने सुसाट पळवितात. त्यातच बजाज चौकातील तो खड्डा रात्रीच्या सुमारास सहज दिसत नसल्याने मोठ्या अपघाताला निमंत्रण मिळत आहे. शिवाजी चौक ते बजाज चौक दरम्यानच्या रस्त्यावर ठिकठिकाणी गतिरोधक लावणे गरजेचे आहे.