लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : देशात जाती व्यवस्था मजबूत होईल, अशा भावनेतून जातीनिहाय जनगणना होत नाही पण अशी भीती बाळगणे चुकीचे आहे. जातीनिहाय जनगणना व्हायलाच पाहिजे, असे स्पष्ट मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत व्यक्त केले.ना. आठवले यांनी विविध प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिली. ते म्हणाले की, दलितांवर देशात होणाºया अत्याचाराला काँग्रेस जबाबदार आहे. काँग्रेसने ७० वर्षांच्या काळात कधीही धर्मांतरीत नवबौद्धांना सवलती देण्याचा प्रयत्न केला नाही. उलट मोदी सरकारने नवबौद्धांना सवलती देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. आमच्या पक्षाची व भाजपची विचारसरणी ही वेगवेगळी असली तरी आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाच्या आधारावर सत्ता चालवित आहे. सत्तेत राहून सामाजिक व आर्थिक समतोल सांभाळण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपा सरकार हे दलितांचे आरक्षण रद्द करणार आहे, अशा अफवा काँग्रेसद्वारे पसरविण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थितीत कोणतेही आरक्षण रद्द करण्यात येणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही त्यांनी यावेळी दिली.देशांतर्गत ७७ टक्के समाज जाती आरक्षणात येत असून उर्वरित २३ टक्के समाज आरक्षणात येत नाही. यामुळे सद्यस्थितीत ५० टक्के असलेली आरक्षण मर्यादा ७५ टक्के वाढवून आरक्षणाची मागणी करणाºया मराठा, मुस्लिमसह इतर सर्व समाज घटकांना आरक्षणाचा लाभ मिळावा, असे मत मांडून ओबीसींच्या वाट्यातून मराठा आरक्षणाला त्यांनी विरोध दर्शविला. मातंग समाजाची वेगळ्या आरक्षणाची मागणी असली तरी जातीनिहाय वेगळे आरक्षण शक्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारला कायदा करावा लागणार आहे. त्याशिवाय या समाजाला आरक्षण मिळणे शक्य नसल्याचेही त्यांनी सांगितले.नांदेड महानगर पालिकेमध्ये झालेला काँग्रेसचा विजय हा त्या पक्षाचा विजय नसून माजी मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण यांची पुण्याई तथा अशोक चव्हाण यांचे नांदेडमधील काम व त्यांचे नियोजन ही या विजयाची कारणे असल्याचे त्यांनी सांगितले.पत्रकार परिषदेला खासदार रामदास तडस, आ. समीर कुणावार, भुपेश थूलकर, आर.एस. वानखेडे, जि.प. सदस्य व रिपाइंचे जिल्हाध्यक्ष विजय आगलावे, अॅड. केशवराव धाबर्डे, शंकर मुंजेवार, सत्यपाल मांडवे, प्रकाश कांबळे, दौलत मून व असंख्य रिपाइं कार्यकर्ते उपस्थित होते.आमदारांतर्फे केंद्रीय राज्यमंत्र्यांचा सत्कारहिंगणघाट - केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी रविवारी सायंकाळी ६ वाजता येथील आ. समीर कुणावार यांच्या निवासस्थानी भेट दिली असता आ. कुणावार यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी खा. रामदास तडस, रिपाइं नेते भुपेश थूलकर, जिल्हाध्यक्ष विजय आगलावे उपस्थित होते.ना. आठवले यांनी खा. तडस, आ. कुणावार यांना सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. त्यावर या योजनांतर्गत दलित, आदिवासी, भटक्या विमुक्त व दिव्यांगांच्या मदतीसाठी विकास निधीची मागणी आ. कुणावार यांनी केली. ना. आठवले यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत योग्य निर्णय घेण्याची ग्वाही दिली. विकास कामांबाबत त्यांनी चर्चाही केली. यावेळी रिपाइंचे शंकर मुंजेवार, सत्यपाल मांडवे, भाजप जिल्हा महामंत्री किशोर दिघे, न.प. उपाध्यक्ष चंदु घुसे, न.प. सभापती अंकुश ठाकूर, न.प. सदस्य छाया सातपुते, चंदू माळवे, निलेश पोगले, भाजप अध्यक्ष आशिष परबत, बिस्मिल्ला खान आदी उपस्थित होते.
जातनिहाय जनगणनेची भीती बाळगणे चुकीचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 11:16 PM
देशात जाती व्यवस्था मजबूत होईल, अशा भावनेतून जातीनिहाय जनगणना होत नाही पण अशी भीती बाळगणे चुकीचे आहे.
ठळक मुद्देरामदास आठवले : हिंगणघाट येथे पत्रकार परिषद, रामदास तडस व समीर कुणावार यांची उपस्थिती