नेताजी वॉर्डातील पाणी समस्येवर युवा स्वाभिमानच्या पदाधिकाऱ्यांची मुख्याधिकाऱ्यांसोबत चर्चा आर्वी : नेताजी वॉर्डातील पाणी समस्येवर तोडगा काढण्यासाठी पालिका प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे. यामुळे वॉर्डातील महिलांनी थेट न.प. कार्यालय गाठले. जोपर्यंत पाण्याचा प्रश्न मिटणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका घेतली. युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांसह महिलांनी निवेदन सादर केले. पाणी समस्येकडे दुर्लक्ष केले तर आंदोलन करण्याचा इशारा दिला. युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी यांचासोबत चर्चा करुन सोमवारपर्यंत नेताजी वॉर्डातील पाणी समस्या निकाली काढण्याची मागणी केली. यावर लवकर तोडगा काढु, असे आश्वासन मुख्याधिकारी यांनी दिल्यावर तात्पुरते आंदोलन मागे घेण्यात आले. पालिका प्रशासन कोणत्या उपाययोजना करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी २२ मार्च ला युवा स्वाभिमानचे दिलीप पोटफोडे यांच्या नेतृत्वात नेताजी वॉर्डातील शेकडो महिल व पुरुष तसेच स्वाभिमानी सैनिकांनी न.प. कार्यालयात ठिय्या दिला होता. त्यावेळी मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी जीवन प्राधिकरणचे खासबागे यांना बोलावून तोडगा काढु असे आश्वासन दिले होते. त्यानुसार २३ मार्च ला मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सभेत असल्याचे सांगितले. दरम्यान गुरूवारी दुपारी ३.३० वाजता नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे हे नेताजी वॉर्डात पोहचले. नागरिकांनी त्यांच्याकडे पाण्याची समस्या मांडली. मात्र नागरिकांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. यानंतर येथील संतप्त महिलांनी युवा स्वाभिमानचे दिलीप पोटफोडे यांच्या नेतृत्त्वात पालिका कार्यालय गाठले. निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला. यावेळी शुभांगी कलोडे, प्रमिला हत्तीमारे, पुंडलीक भुरके, आशा भुरके, न्यामत भाई, शकुंतला अळसपूरे, यशोदा चोपडे, बेबी हिवरे, ज्योती भुरके, ज्योती हत्तीमारे आदींची उपस्थिती होती.(तालुका/शहर प्रतिनिधी)
पाणी प्रश्नावरून महिला आक्रमक
By admin | Published: March 25, 2017 1:12 AM