लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : मार्च २००३ मध्ये डबघाईस आलेला कॉटन मील १० वर्षांपूर्वी अत्याधुनिक यंत्र सामुग्रीसह सुरू झाला. यात ३०० युवकांना रोजगार मिळाला असला तरी कामगारांची आर्थिक कोंडी होत आहे. कामगार कायद्यानुसार वेतन व इतर सुविधा मिळत नाही. यामुळे कामगारांच्या न्याय्य मागण्यांसाठी बुधवारी मील गेटसमोर प्रहार कामगार संघटनेने एकदिवसीय उपोषण करीत आंदोलनाची पूर्वसूचना दिली.किमान वेतन कायद्यानुसार कामगारांना वेतन द्यावे. कामगारांना पगार पत्रक द्यावे. मासिक पगार प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेच्या आत करावा. स्थानिक कामगारांना नोकरीत प्राधान्य द्यावे. कामगारांची प्रत्येक महिन्यात आरोग्य तपासणी करावी. कामगारांना घरभाडे भत्ता लागू करावा. कंपनीत कच्चा माल उपलब्ध न झाल्यास कामगार घरी परत न पाठविता त्या दिवसाचा पगार द्यावा यासह अन्य मागण्यांचे निवेदन संघटनेच्या प्रतिनिधींनी मील प्रशासनाला दिले. उपोषणात कामगार संघटनेचे अध्यक्ष जुबेर अहमद, सचिव वैभव धांदे, तेजस ठाकूर, सैयद शकील, प्रतिक घरडे, राजेश शिंगणापुरे, दीपक पिंपळकर, शैलेश महल्ले, दीपक शिंगणापुरे, शेख जाफर, प्रफुल उईके, सुरज येसनकर, सचिन बेले, गजानन गजबे, सचिन टेंभरे, प्रशांत चाफले, नितीन अडेकर, आकाश घोडमारे, रोशन येंडे, सचिन कोंबे व कामगारांचा सहभाग होता.
मील कामगारांच्या मागण्यांसाठी प्रहारचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 11:48 PM