वर्धा : शेतांची मोजणी करण्याचे काम भूमी अभिलेख कार्यालय करते़ यासाठी शेतकऱ्यांकडून शुल्कही वसूल केले जाते; पण अधिकारी मोजणी करताना आढेवेढे घेतात़ सरूळ येथे तर अधिकाऱ्यांनी अर्धवटच मोजणी केल्याचा प्रताप उघड झाला़ या प्रकारामुळे शेतकऱ्याची कुचंबना झाली़ वरिष्ठांनी असे प्रकार रोखण्यासाठी कारवाई करणे गरजेचे झाले आहे़सरूळ येथील रहिवाशी बळीराम गावंडे यांनी प्लॉट क्ऱ ०.०३ आर. सर्व्हे क्ऱ १६५ च्या मोजणीकरिता रितसर भूमी अभिलेख कार्यालय देवळी येथे अर्ज केला़ शासन नियमानुसार शुल्क अदा केले़ यावरून जागेच्या मोजणीसाठी भूमी अभिलेख अधिकारी एन.सी. जाधव मोक्यावर दाखल झाले़ यात गावंडे यांनी संबंधित जागा त्या अधिकाऱ्याला दाखविली़ यावर जाधव यांनी सोबतच्या मजुरांना झाडे दाखविण्यासाठी पाठविले आणि परिसरातील शेताची मोजणी केली; पण ज्या जागेच्या मोजणीसाठी ते आले होते, ती जागा मोजलीच नाही. गावंडे यांनी जागा का मोजली नाही, अशी विचारणा केली असता उर्वरित मोजणी गुरूवारी करू, तुम्ही सही द्या, अशी बतावणी केली़ गावंडे यांनी सही देण्यास नकार दिला असता सदर अधिकाऱ्याने मी माझ्या मनाने लिहून घेईल, मोजणी करणार म्हटले तर करणार, अशी धमकावणी केली़ यामुळे शेतकऱ्याने सही केली़ याबाबत रितसर पावतीही देण्यात आली नाही़ यानंतर गुरूवारी अधिकारी आलेच नाही़ भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता मोजणी करून देण्यास नकार देत शिवीगाळ केली़ शेतकऱ्याने वरिष्ठांना तक्रार केली असता उडवाउडवीची उत्तर देण्यात आली़ यामुळे बळीराम गावंडे यांनी तहसीलदार, जिल्हाधिकारी, अधीक्षक भूमी अभिलेख यांना निवेदन सादर केले आहे़(तालुका प्रतिनिधी) \
शेताची मोजणी अर्धवट अधिकारी बेपत्ता
By admin | Published: February 27, 2015 12:07 AM