महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कीटकजन्य आजार अशी डेंग्यूची ओळख. पण सध्या याच आजाराच्या प्रादुर्भावाचा आलेख जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात मागील काही वर्षांपासून वाढतच असल्याचे वास्तव आहे. माॅन्सूनने हजेरी लावल्यावर ठिकठिकाणी पाणी साचत असल्याने डासांच्या उत्पत्तीत वाढ होत असून, हेच साचणारे स्वच्छ पाणी डेंग्यूचा प्रादुर्भावाला खतपाणी देण्यासाठी पोषक ठरत असल्याने नागरिकांनीही पावसाळ्याच्या दिवसांत दक्ष राहून खबरदारीच्या विविध उपाययोजना करण्याची गरज आहे.
‘ड्राय-डे’च ठरतो उपयुक्त - डेंग्यू हा कीटकजन्य आजार विषाणूजन्य रोग आहे. एडिस एजिप्ती या जातीच्या डासाच्या मादीच्या माध्यमातून त्याचा झपाट्याने प्रसार होतो. या आजाराला ब्रेक लावण्यासाठी विशेष करून आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळणे फायद्याचेच ठरत असल्याचे सांगण्यात आले.
असा होतो प्रसार
कीटकजन्य आजार असलेल्या डेंग्यूचा विषाणू प्रामुख्याने एडिस एजिप्ती या जातीच्या डासाच्या मादीच्या माध्यमातून पसरतो. एडिस अल्बोपिक्टस या जातीचे डासही काही प्रमाणात या संसर्गास कारणीभूत असतात. डासांच्या या प्रजाती चिकुनगुनिया, यलो फिव्हर आणि झिका विषाणूही पसरवतात. पाऊस, तापमान, आर्द्रता आणि शहरांची अनिर्बंध वाढ या कारणांनी त्या त्या ठिकाणी डेंग्यूचा उद्भव आणि प्रसार होतो.
शहरी भागात घेतले सर्वाधिक बळी- मागील पाच वर्षांत जिल्ह्यात डेंग्यूमुळे तब्बल १५ व्यक्तींचा मृत्यू झाला. यात शहरी भागातील आठ, तर ग्रामीण भागातील सात रहिवाशांचा समावेश आहे.
डासाच्या शरीरात पुनरुत्पादन संसर्ग झालेल्या व्यक्तीने प्रवास केल्यास त्यांच्यासोबत डेंग्यूचे विषाणू नव्या प्रदेशात जातात. संसर्ग झालेल्या व्यक्तीला डास चावून ते दुसऱ्या व्यक्तींना चावल्यास विषाणूचा संसर्ग होतो. कारण विषाणूंचे डासाच्या शरीरात पुनरुत्पादन होत असल्याचे सांगण्यात आले.
डेंग्यू हा कीटकजन्य आजार आहे. पावसाळ्याच्या दिवसांत पावसाचे पाणी ठिकठिकाणी साचून डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होते. परिणामी, याच दिवसांत डेंग्यूचा प्रादुर्भाव अधिक वाढतो. त्यामुळे या दिवसांत नागरिकांनी अधिक दक्ष राहून खबरदारीच्या उपाययोजनांचे पालन केले पाहिजे.- डॉ. जयश्री थोटे, जिल्हा हिवताप अधिकारी, वर्धा.