मुख्याध्यापक संघाचा आरोप : जि.प.च्या वर्गांविरोधात पोलिसात जाणार वर्धा : जिल्हा परिषदेच्या शाळांत अंतराच्या नियमांचे उल्लंघन करून सुरू करण्यात आलेले पाचवा आणि आठवा वर्ग अवैध असल्याचा आरोप माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्यावतीने करण्यात आला आहे. हे वर्ग बंद करण्यासंदर्भात जि.प. मुख्यकार्यपालन अधिकाऱ्यांशी चर्चा करीत ते वर्ग बंद करण्याची मागणी संघाच्यावतीने करण्यात आली असून याकडे दुर्लक्ष झाल्यास या वर्गाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. असे झाल्यास विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येण्याचे संकेत आहेत. मोफत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांत पाचवा आणि आठवा वर्ग सुरू करण्यासंदर्भात शासनाने निर्णय घेतला. वाढीव वर्ग जोडत असताना शाळेपासून नियमात असलेल्या अंतरावर त्याच माध्यमाची दुसरी शाळा नसल्याची खात्री करावी, असे सूचविण्यात आले होते. असे असताना जिल्हा परिषदेच्या काही शाळांनी अटींचे उल्लंघन करीत वर्ग सुरू केल्याचा आरोप मुख्याध्यापक संघाने केला. जे वर्ग नियमाच अटीत बसत नाहीत ते बंद करण्याचे शिक्षण उपसंचालकांनी पत्र दिले असताना वर्धेत कार्यवाही झाली नसल्याचे संघाच्यावतीने कळविण्यात आले आहे. यामुळे सोमवारी सीईओ नयना गुंडे यांची भेट घेत यावर कारवाई करण्याची मागणी संघाच्यावतीने करण्यात आली आहे.(प्रतिनिधी)
पाचवा व आठवा वर्ग अवैध
By admin | Published: July 27, 2016 12:03 AM