रिपाइंचे जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन वर्धा : सेवाग्राम येथील कस्तुरबा गांधी चौक परिसरातील फुटपाथ व्यावसायिकांकडून दुकानाच्या गाळे आणि स्थायी पट्ट्यांकरिता लढा उभारण्यात आला आहे. या मागणीकरिता रिपाइंच्यावतीने जिल्हा परिषद सदस्य विजय आगलावे यांच्या उपस्थितीत मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेत मागण्यांचे निवदेन सादर करण्यात आले. सेवाग्राम गांधी चौक परिसरातील गरीब फुटपाथ दुकानदारांवर कस्तुरबा हॉस्पीटलच्या व्यवस्थापनाच्या हेतुपूरस्पर धोरणामुळे उपासमारीची वेळ आलेली आहे. या व्यवस्थापनाने ग्रामपंचायत तसेच जिल्हा प्रशासनाची मुजोरी करून फुटपाथ दुकानदाराची रोजमजुरी बंद करण्याचा कुटील डाव सुरू केलेला आहे. कस्तुरबा गांधी रुग्णालय व्यवस्थापनाकडून फुटपाथ दुकानदारांकरिता जागा व गाळे उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.हातगाडीवर चालतो अनेकांचा उदरनिर्वाह वर्धा : सेवाग्राम गांधी चौकात व परिसरात फळ व भाजीपाला तसेच अन्य जीवनोपयोगी वस्तुचा किरकोळ व्यवसाय करून अनेक कुटुंब आपला उदरनिर्वाह करीत आहेत. या गरीब कुटुंबांवर कस्तुरबा गांधी तसेच जिल्हा व्यवस्थापन समितीमार्फत अन्याय होत असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याचा आरोप विजय आगलावे यांनी केला आहे. त्यामुळे आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे रिपाइंचा मोर्चा धडकला. यावेळी रिपाइं कार्यकर्ते आणि अन्यायग्रस्त फुटपाथ दुकानदार मोठ्या संख्येने सहभागी होते. या दुकानदारांकडून गत ३० ते ४० वर्षांपासून हा व्यवसाय सुरू आहे. त्यांना कस्तुरबा रुग्णालयाच्या व्यवस्थापनाकडून वारंवार अनेक वर्षांपासून फुटपाटची जागा खाली करा ही जागा आमच्या मालकीची आहे, असे म्हणत बेरोजगार करण्याचे षडयंत्र रचत असल्याचे आगलावे यांचे म्हणणे आहे. या गरीब फुटपाथ दुकानदारांना त्रास देणाऱ्या संस्थेवर कार्यवाही करून दुकानदारांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आलेली आहे. याकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सुद्धा निवेदनातून देण्यात आला.(प्रतिनिधी)
फुटपाथ व्यवसायिकांचा गाळ्यांकरिता लढा
By admin | Published: April 12, 2017 12:21 AM