तळेगाव गैरव्यवहार प्रकरण : जि.प. सभापती व सरपंचांची बीडीओकडे धाववर्धा : तालुक्यातील तळेगाव(टा.) मध्ये विविध विकास कामांतील कथित भ्रष्टाचारप्र्रकरणी तब्बल १७ ग्रामस्थांनी मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे, तर दुसरीकडे बुधवारी जि.प. सभापती मिलिंद भेंडे यांनी परिसरातील काही सरपंचांना सोबत घेऊन प्रशासनाकडे धाव घेत ग्रा.पं.बाबत भ्रष्टाचाराची खोटी तक्रार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. वास्तविक, तक्रारकर्त्यांमध्ये भाजप सदस्य आघाडीवर असल्यामुळे तळेगावात भाजपला अंतर्गत कलहाचा सामना करावा लागत आहे. सभापती भेंडे यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनानुसार, तळेगाव (टा.) ग्रामपंचायतमधील काही कामांवर आक्षेप घेऊन तक्रार दाखल केली होती. सदर प्रकरणी चौकशी झाली असून सर्व मुद्यांवर कुठल्याही प्रकारचा दोष सिद्ध झाला नाही. तक्रारीतून नमुद व्यक्तीवर आकसापोटी आरोप केले. तसेच सभापती मिलिंद भेंडे, सरपंच अतुल तिमांडे, उपसरपंच शारदा मोहिजे व ग्रा.पं. सदस्य गजानन येवतकर यांची बदनामी केली. प्रचंड प्रमाणात मानसिक त्रास दिला. यातील गजानन पोहाणे व प्रमोद वंजारी यांनी खोटे शपथपत्र सादर केले. यामुळे त्यांच्याविरुद्ध शासनाची दिशाभूल व बदनामी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करुन न्याय द्यावा, असेही तक्रारीत नमुद आहे. शिष्टमंडळात जि.प. शिक्षण व आरोग्य सभापती भेंडे यांच्यासह तळेगावचे सरपंच अतुल तिमांडे, एकुर्लीचे भास्कर वरभे, इंझापूरचे पंकज येरणे, वायगावचे गणेश वांदाडे, सेलुकाटेचे विजय तळवेकर, भिवापूरच्या जोत्स्ना पाल, गोजीचे उपसरपंच अतुल दिवे, तळेगावचे ग्रा.पं. सदस्य कृष्णा गुजरकर, गजानन येवतकर यांच्यासह अन्य २५ नागरिकांचा समावेश होता.(जिल्हा प्रतिनिधी)
तक्रारकर्त्यांवर गुन्हे दाखल करा
By admin | Published: September 17, 2015 2:46 AM