पाच लाखांची मागणी : समुद्रपूर पोलिसांकडून तपास सुरू लोकमत न्यूज नेटवर्क समुद्रपूर : लग्न दोन दिवसांवर आले असताना मुलाकडच्या कुटुंबियांनी जेसीबी घेण्याकरिता वधुपक्षाला ५ लाख रुपये हुंडा मागितला. याबाबतची तक्रार समुद्रपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी वरपक्षावर गुन्हा नोंद केला आहे. ही तक्रार शुक्रवारी करण्यात आली. परडा निवासी व शासकीय दवाखान्यात परिचारिका असलेल्या एका मुलीचे लग्न हिंगणघाटचे श्रीराम कळबे यांचा मुलगा कुलभूषण याच्यासोबत पक्के झाले होते. सदर मुलगा निर्मल उज्वल बँकेत नोकरीवर आहे. दोन्ही कुटुंब लग्नासाठी तयार असल्याने २ एप्रिलला परडा येथे साक्षगंध झाले. या दोघांचे लग्न २५ जून रोजी नागपूर येथे होणार होते. वधुपक्षातील मंडळी वराला कपडे घेण्याकरिता गेले असता दोन्ही कुटुंबियांची बैठक झाली. त्यामध्ये मुलाच्या कुटुंबियांनी जेसीबी घेण्याकरिता ५ लाख रुपये, कपड्यांकरिता ४५ हजार व दोन तोळयाचा गोफ याची मागणी केली. ही मागणी पूर्ण करीत असाल तरच लग्न होईल अन्यथा लग्न तोडण्याची धमकी दिली. वरपक्षाकडून आलेली ही मागणी ऐनवेळी पूर्ण करणे वधुकडील मंडळींना शक्य नव्हते. या धमकावणीमुळे मुलीच्या भावाने समुद्रपूर पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. सदर तक्रारीवरुन मुलगा कुलभूषण कळबे, पेट्रोलपंप मालक वडील श्रीराम कळबे, आई, दोन भाऊ, दोन वहिनी अशा एकूण सात जणांवर कलम ३,४ हुंडा प्रतिबंधक अधिनियम १९६१ प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अजय अवचट करीत आहे. हुंडा प्रतिबंधक कायद्याविषयी जनजागृती करण्यात आली तरीही समाजातील सुशीक्षित मंडळीकडून हुंड्याची मागणी आजही केली जात असल्याचे दिसते.
हुंडा मागणाऱ्या मुलाच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल
By admin | Published: June 24, 2017 12:57 AM