हिंगणघाट : शहरातील वाहतूक पोलिसांची पदे रिक्त आहेत. यामुळे वाहतुकीच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. शहरातील वाढती लोकसंख्या, वाहनांच्या संख्येत झालेली भरमसाठ वाढ व अपूरा वाहतूक पोलीस कर्मचारी वर्ग यामुळे पोलीस यंत्रणेवर अतिरिक्त ताण येत आहे. शिवाय सामान्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागतो. यासाठी शासनाने पोलीस विभागातील वाहतूक पोलिसांची रिक्त पदे त्वरित भरावीत, अशी मागणी जिल्हा लोकजनशक्ती पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.शासनाला दिलेल्या निवेदनातून तिमांडे यांनी हिंगणघाट शहराची लोकसंख्या ही जवळपास सव्वा लाख आहे. शहरी आणि ग्रामीण जनतेची मुख्य बाजारपेठ असून विदर्भातील क्रमांक दोनची कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ व राष्ट्रीय रेल्वे मुख्य महामार्गावर हे शहर वसले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. उपजिल्हा रुग्णालय, विविध महत्त्वाची शासकीय कार्यालये, दिवाणी आणि फौजदारी न्यायालये येथे आहेत. विविध राष्ट्रीयकृत बँका असून हिंगणघाट शहराची औद्योगिक नगरी म्हणून ओळख आहे. विविध कंपन्या शहर व परिसरात आहे. यामुळे वाढत्या वाहनांची वर्दळ आणि लोकसंख्या यांच्या तुलनेत पोलीस कर्मचारी वर्ग अपूरा आहे. परिणामी, मुख्य रस्ता, चौरस्ता, शासकीय कार्यालये, बाजारपेठ आदी परिसरातील वाहतुकीची समस्या जटील होत असल्याचे दिसून येत आहे. ही वाहतूक सांभाळण्याचा अतिरिक्त ताण अपूऱ्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत असल्याचे दिसते. पोलिसांच्या कमतरतेमुळे वाहतुकीची समस्या पोलीस यंत्रणेपूढे एक आव्हानच ठरत आहे. राज्याच्या गृह विभागाने याची गांभिर्याने दखल घेणे गरजेचे झाले आहे. राज्यात आज लोकसंख्येच्या प्रमाणात कर्मचारी कमी पडत आहेत. हजारो पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. यामुळे शासनाने प्राधान्याने ही पदे भरणे गरजेचे झाले आहे. याबाबत शासनाने योग्य ती सकारात्मक भूमिका घेऊन किमान हिंगणघाट शहरातील पोलिसांची रिक्त पदे त्वरित भरावीत, अशी न्याय्य मागणी जिल्हा लोकजनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष संतोष तिमांडे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष राजश्री दुब्बावार, केशव तितरे, राजेंद्र मुनोत, सुभाष मिसाळे, मोरेश्वर पिंपळशेंडे, चुडीवाले, कावळे, याकुब, चंपत बावणे, गोविंदा दांडेकर, गोविंदा गायकवाड आदींनी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना सादर निवेदनातून केली आहे.(तालुका प्रतिनिधी)
वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांची रिक्त पदे भरा
By admin | Published: September 10, 2015 2:46 AM