गजेंद्र अहिरे : प्रकट मुलाखतीत चित्रपट क्षेत्रातील घडामोडींवर भाष्य वर्धा : कोणताही चित्रपट मला मनात पूर्ण दिसतो तेव्हाच मी कामाला सुरुवात करतो. पहिले मी तो विषय जगतो आणि नंतर तो कागदावर उतरवितो. कदाचित मी स्वत: पटकथाकार आणि दिग्दर्शक असल्यामुळे असे घडत असावे. प्रत्येक चित्रपट पहिला आणि शेवटचाच समजून करतो. त्यामुळे माझ्या संपूर्ण कौशल्यासह सर्जनशीलतेचा कस त्यात उतरतो, असे उद्गार सुप्रसिद्ध मराठी चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथाकार गजेंद्र अहिरे यांनी प्रकट मुलाखतीत काढले. इंडियन पिपल थिएटर असोसिएशन ‘इप्टा’ व यशवंतराव दाते स्मृती संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले. नाटककार डॉ. सतीश पावडे यांनी ही मुलाखत घेतली. अध्यक्षस्थानी प्रदीप दाते होते तर इप्टाचे राजू बावणे यांची प्रमुख उपस्थिती होती. अहिरे यांनी प्रश्नांची दिलखुलास आणि मनमोकळी उत्तरे दिली. मुलाखतीच्या दरम्यान श्रोत्यामांमधून काही प्रश्न विचारण्यात आले. डॉ. राजेंद्र मुंढे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अहिरे म्हणाले, माझी प्रत्येक कलाकृती अंतिमच असते, त्यात मी स्वत:ला संपूर्ण झोकून देत असतो, कारण मला चित्रपटानेच सर्वस्व दिले आहे, लोकांचा विश्वास मला चित्रपटांमुळेच जिंकता आला आहे. त्यामुळेच कोण कुठला ९० वर्षाचा म्हातारा माझा अनुमती सिनेमा बघून मला फोन करून भेटण्याची इच्छा व्यक्त करतो. दोन भेटीतच त्याचा कोट्यवधींच्या संपत्तीचा विश्वस्त होण्याची गळ घालतो. यातील काही भाग नवोदित कलावंतासाठी ठेव म्हणून ठेवावयास सांगतो, हीच माझ्या आयुष्याची सर्वात मोठी मिळकत आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. ४४ चित्रपट बनवून जे समाधान मला मिळाले त्याच्या कितीतरीपट हे समाधान मोठे आहे. हेच माझे कामाचे साफल्य मी समजतो. या क्षेत्राची ओढ असलेल्या नवोदितांना संदेश देतांना ते म्हणाले, केवळ हौस म्हणून आलेल्या लोकांची संख्या हजारोंची आहे. परंतु इथे सुरुवातीला संघर्ष करावाच लागतो. माझ्या ५० वर्षाच्या आयुष्यात निम्मी वर्षे मी याकरिता दिली आहे. नागराज मंजुळे एका रात्रीतून मोठा होत नाही, असे सांगितले. याप्रसंगी गजेंद्र अहिरे यांना चरख्याची प्रतिकृती, शाल व सुतमला देऊन दाते संस्थेचे अध्यक्ष प्रदीप दाते यांच्या हस्ते सन्मानित केले. प्रास्ताविक प्रा. शेख हाशम यांनी केले. संचालन डॉ. स्मिता वानखेडे यांनी तर आभार राजू बावणे यांनी मानले.(स्थानिक प्रतिनिधी)
चित्रपट पहिला आणि शेवटचा समजून करतो
By admin | Published: March 09, 2017 1:03 AM