वर्धा : विधानसभा निवडणुकीत भाजपने शतप्रतिशत यश प्राप्त केले आहे. जिल्ह्यातील चारही जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रत्येकी दोन्ही उमेदवार पराभूत झाले आहेत.
जिल्ह्यात वर्धा, आर्वी, देवळी आणि हिंगणघाट असे चार मतदारसंघ आहेत. यापैकी तीन मतदारसंघांत मतमोजणी सुरू झाल्यानंतर सुरुवातीपासून भाजप उमेदवारांनी आघाडी घेतली होती. केवळ वर्धा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर होते. मात्र, जवळपास तेराव्या फेरीनंतर वर्धेतही भाजपने मुसंडी मारली. काँग्रेस उमेदवाराची आघाडी भरून काढत विजयाकडे आगेकूच सुरू केली होती. अखेर चारही मतदारसंघांत भाजप उमेदवार विजयी झाले. त्यामुळे आता ‘गांधी जिल्हा’ म्हणून ओळख असलेल्या वर्धा जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार झाली आहे. गांधी जिल्हा प्रथमच ‘काँग्रेस’मुक्त झाला आहे.
जिल्ह्यातील वर्धा मतदारसंघातून भाजपचे डॉ. पंकज भोयर, आर्वीतून सुमित वानखेडे, देवळीतून राजेश बकाने आणि हिंगणघाटमधून समीर कुणावार विजयी झाले आहेत. चारही जागांवर भाजपने विजयश्री प्राप्त केली आहे. वर्धा येथे काँग्रेसचे शेखर शेंडे, देवळीत काँग्रेसचेच विद्यमान आमदार रणजित कांबळे, आर्वीत खासदार अमर काळे यांच्या धर्मपत्नी आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार मयूरा काळे, तर हिंगणघाटमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अतुल वांदिले यांना पराभवाचा झटका बसला आहे. एक प्रकारे महाविकास आघाडीचा जिल्ह्यात सुपडा साफ झाला आहे.बॉक्स
दोघांची हॅटट्रिक, दोघे पहिल्यांदा आमदारजिल्ह्यातील विजयी झालेल्या चारपैकी दोघांनी हॅटट्रिक केली आहे. दोन आमदार पहिल्यांदाच विधानसभेत पोहोचले आहेत. वर्धेतून डॉ. पंकज भोयर, तर हिंगणघाटमधून समीर कुणावार यांना भाजपने सलग तिसऱ्यांदा उमेदवारी दिली होती. डॉ. भोयर आणि कुणावार यांनी विजय प्राप्त करून हॅटट्रिक साधली आहे. भाजपने आर्वीतून सुमित वानखेडे आणि देवळीतून राजेश बकाने यांना उमेदवारी दिली होती. या दोघांनी विजय मिळवून विधानसभेत प्रवेश मिळविला आहे.