लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील दीड वर्षांपासून पोलीस दल कोरोनाशी लढा देत आहेत. अनेक पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाने कवेत घेतले. पण, तरीही पोलीस कर्मचारी आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडण्याचे काम करीत आहे. पोलिसांनी जानेवारी ते मे या पाच महिन्याच्या कालावधीत नियमोल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करीत तब्बल २९ लाख ६७ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. काेरोनाची दुसरी लाट महाभयंकर असून रुग्णसंख्येसोबतच मृत्यूदरातही कमालीची वाढ होत चालली आहे. असे असताना पोलीस प्रशासन देखील परिस्थितशी लढा देण्यास सज्ज झालेले दिसून येत आहे. जिल्ह्यातील १७ तपासणी नाक्यांवरून पोलीस कर्मचारी अहोरात्र कर्तव्य पार पाडत आहेत. पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना करुन कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिलेले असून त्यांच्या मार्गदर्शनात पोलीस अधिकारी व कर्मचारी आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडत असल्याचे चित्र आहे. इतकेच नव्हे तर लग्नासाठी परवानगी देण्याचे काम असो की, ई-पास देण्याची जबाबदारी हे दोन्ही कार्य विदर्भात सर्वात आधी वर्धा पोलीस दलानेच सुरू केल्याची माहिती पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी दिली. दीड हजार पोलीस कर्मचारी आणि २०० अधिकाऱ्यांच्या खांद्यावर नागरिकांची सुरक्षा करण्याचे काम पोलीस विभागाकडून सुरु असून हे काम अविरत सुुरू ठेवणार असे ते म्हणाले.
शासकीय रुग्णालयांत उभारल्या चौक्या जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये आणि ग्रामीण रुग्णालयासह सेवाग्राम येथील कोविड केअर सेंटर आणि सावंगी येथील कोविड केअर सेंटरमध्ये पोलीस चौक्या उभारण्यात आल्या आहेत. डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी आणि नागरिकांच्या समाधानासाठी या चौक्यांमध्ये दिवसरात्र पोलीस कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहेत. डॉक्टरांवर होणारे हल्ले, रुग्णांच्या नातेवाईकांकडून होणाऱ्या रोषाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस दलाने हे पाऊल उचलले आहे.
९४० वाहनांवर कारवाई कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले असले तरी मोकाट फिरणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही, अशांवर कारवाई करीत पोलिसांनी त्यांच्याकडून दंड वसूल केला. तब्बल ९४० वाहनांवर कारवाई करण्यात आली असून काही दुचाक्या देखील जप्त करण्यात आल्या.
कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षाही भयंकर आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. विनाकारण घराबाहेर न फिरणे, सामाजिक अंतर राखणे आदी कोरोना नियमांचे पालन करावे. विनाकारण बाहेर फिरल्यास नाईलाजास्तव नागरिकांना पोलीस कारवाईला सामोरे जावे लागेल. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे. -प्रशांत होळकर, पोलीस अधीक्षक.
पोलीस रुग्णालय ठरले राज्यात पहिले- जिल्हा प्रशासनाने केंद्र वाढविण्याच्या सूचना दिल्या होत्या. पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी तात्काळ पोलीस रुग्णालयात लसीकरण केंद्र देण्यास मंजुरी दिली. राज्यात पोलीस रुग्णालयात लसीकरण केंद्र दिल्याचा पहिला प्रयोग होता. त्यानंतर इतरही जिल्ह्यातील पोलीस रुग्णालयात लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे.