वर्धा : वाढत्या उन्हामुळे आगीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असतानाच शहरातील वर्दळीचा असलेल्या महादेवपुरा परिसरातील शिव गादी भंडार या गादी कारखान्याला सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत दुकानातील लाखो रुपयांचे साहित्य तसेच कापसाच्या गाठी जळून कोळसा झाल्या. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
चेतन गियानी यांच्या मालकीचे महादेवपुरा परिसरात शिव गादी भंडार आहे. या दुकानात गादी बनविण्यासह फर्निचरचे सर्व साहित्य बनविण्याचे काम केले जातात. दररोजप्रमाणे दुकानात कामकाज सुरू असतानाच दुपारी १२ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. धूर निघू लागला, पाहता-पाहता आगीने रौद्ररुप धारण केल्याने आग दुकानात पसरली. आगीचे लोळ उठताना दिसताच दुकानात काम करणाऱ्यांनी हाती येईल ते साहित्य बाहेर काढले. मात्र, आगीने अख्खे दुकानच कवेत घेतल्याने सर्व साहित्याचा कोळसा झाला. आगीमध्ये तळमजला तसेच पहिल्या माळ्यावरील साहित्य तसेच यंत्रसामग्री जळून खाक झाली.
अग्निशमन बंबाने केला पाण्याचा मारा
आगीचे लोळ उठताना दिसताच परिसरात एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ झाली. आगीची माहिती मिळताच नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत अग्निशमन बंबाच्या साहाय्याने आगीवर पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न केले. अखेर अथक परिश्रामानंतर आगीवर नियंत्रण मिळाले. मात्र, यात दुकानमालक गियानी यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
अडीच तास आग अन् साहित्याची राखरांगोळी
शिव गादी भंडार या दुकानात कापूस, रुई, गाद्या, क्राॅपलॉन, फोम, कापड, रुई तसेच फोमच्या गाद्या, घरातील सर्व इंटेरिअर डेकोरेशनकरिता वापरण्यात येणारे साहित्य, कापडी पडदे, कापड आदी साहित्य होते. आगीमध्ये सर्व साहित्य यंत्रासहित जळून राखरांगोळी झाली.
यापूर्वीही लागली होती दुकानाला आग
शिव गादी भंडार या दुकानाला यापूर्वीही आग लागल्याची घटना घडली होती. आतापर्यंत या दुकानाला आग लागल्याची ही तिसरी घटना असल्याचे परिसरातील नागरिकांकडून बोलल्या जात होते. मात्र, नेमकी उन्हाळ्यातच आग कशी लागते, असेही परिसरातील नागरिकातून बोलल्या जात होते हे विशेष.
१५ दिवसांपूर्वी रोहित्राने घेतला होता पेट
महादेवपुरा परिसरात असलेल्या शिव गादी भंडार या दुकानालगतच असलेल्या रोहित्राने पेट घेतल्याची घटना १५ दिवसांपूर्वी घडली होती. सुदैवाने कुणालाही हानी झाली नव्हती. अग्निशमन दलाच्या बंबाच्या सहाय्याने रोहित्रावर पाण्याचा मारा करून आग विझविण्यात आली होती. सोमवारी देखील रोहित्रावरून जाणारी वीज बंद करण्यात आली होती.