देवळी : येथील औद्योगिक वसाहतीतील संजय इंडस्ट्रीजच्या जिनिंग सेक्शनमध्ये रविवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. यात कापूस, रुई व इतर साहित्य जळाल्याने १५ लाखांचे नुकसान झाले आहे.
जिनिंग सेक्शन मध्ये कापसावर प्रक्रिया सूरू असताना मशीनमध्ये अचानक स्पार्कींग झाली. दरम्यान आगीची ठिणगी पडून आगीने संपूर्ण कापसाला आपल्या कवेत घेतले. आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू असताना फायरबॉलचा भडका उडाल्याने जिनिंगचा फिडर जखमी झाला. या आगीत जिनिंग सेक्शनमधील कापूस व रूई आगीचे भक्ष्य ठरले. तसेच या सेक्शन मधील मशीन, मोटार वायरींग, बेल्ट, ट्रॉली प्लॅटफॉर्म आदी जळाल्याने सुमारे १५ लाखांचे नुकसान झाले. आग लागल्याची माहिती मिळताच न.प.च्या अग्निशमन दलाच्या जवानांनी अग्निशमन बंबासह घटनास्थळ गाठले. परिसरातील नागरिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. या घटनेची नोंद देवळी पोलिसांनी घेतली आहे.