लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाची महामारी आणि पूरपरिस्थिमुळे तब्बल तिनदा पुढे ढकलण्यात आलेली पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीपरीक्षा आज जिल्ह्यातील ७४ केंद्रावर शांततेत पार पडली. दोन पाळीत घेण्यात आलेल्या या परीक्षेमध्ये पाचशेपेक्षा अधिक विद्यार्थी अनुपस्थित होते. या परीक्षेदरम्यान प्रत्येक केंद्रावर पोलिसांचीही सुरक्षा होती.महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेकरिता जिल्ह्यातील पाचवीचे ४ हजार १० तर आठवीचे २ हजार ८२८ असे एकूण ६ हजार ९३८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. आज आठही तालुक्यातील ७४ परीक्षा केंद्रावरुन दोन पाळीत ही परीक्षा घेण्यात आली. कोरोनाच्या नियमांचे पालन करुन सर्व सोयी-सुविधा परीक्षा केंद्रावर पुरविण्यात आल्या होत्या. सकाळी ११ ते दुपारी १२.३० या वेळेत झालेल्या पहिल्या पेपरला पाचवीचे २९३ तर आठवीचे २१८ असे एकूण ५११ विद्यार्थी गैरहजर होते. तर दुपारी १.३० ते ३.०० वाजेदरम्यान झालेल्या दुसऱ्या पेपरला पाचवीचे ३०२ तर आठवीचे २२४ असे ५२६ विद्यार्थी गैरहजर होते. पहिल्या पेपर पेक्षा दुसऱ्या पेपरला गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक होती. परीक्षा शांततेप पार पडावी याकरिता शिक्षण विभागाकडून दहा भरारी पथक नेमन्यात आले होते. या पथकांनी तालुकास्तरावरही भेटी देवून केंंद्रावरील परिस्थितींचा आढावा घेतला. सर्वच परीक्षा केंद्रावर शिष्यवृत्तीची परीक्षा सुरळीत पार पडली.
स्वच्छतेचा अभाव- शिष्यवृत्ती परीक्षेकरिता वर्धा शहरातील न्यू इंग्लिश कॉन्व्हेटेही परीक्षा केंद्र होते. बऱ्याच दिवसांपासून शाळा बंद असल्याने वर्ग खोल्यांच्या स्वच्छतेअभावी जाळे लागलेले आहे. त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, अशी तक्रार पालकांनी लोकमतकडे केली. पण, स्वच्छतेचा विषय सोडला तर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती, असे निदर्शनास आले.