आंजी (मोठी) : भाड्याने राहत असलेल्या घरामध्ये पत्नीला दगडाने मारहाण करून तिची हत्या केली. त्यानंतर पतीनेही विष पिऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना बुधवारी रात्री आंजी (मोठी) येथील वॉर्ड क्रमांक ४ मध्ये उघडकीस आली. या प्रकरणी खरांगणा (मोरांगणा) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुंदन ज्ञानेश्वर कांबळे (४५) व शीतल कुंदन कांबळे (४०) (रा. धुळवा) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. कांबळे दाम्पत्य काही वर्षांपासून आंजी (मोठी) येथे वॉर्ड क्रमांक ४ मध्ये भाड्याने राहत होते. बुधवारी सायंकाळपर्यंत त्यांच्या घराचे दार उघडले नसल्यामुळे शेजाऱ्यांनी याबाबत त्यांच्या भावाला कळविले. भावाने लगेच पोलिस चौकीत माहिती दिली असता, पोलिसांनी रात्री ८ वाजता घटनास्थळ गाठले. पोलिसांनी मोठ्या परिश्रमाने घराचे दार उघडल्यावर पती-पत्नी मृतावस्थेत आढळले. यानंतर खरांगण्याचे ठाणेदार संतोष शेगावकर हे सुद्धा पूर्ण यंत्रणेसह पोहोचले. पोलिसांच्या प्राथमिक तपासात पती कुंदन याने पत्नी शीतलची दगडाने मारहाण करत हत्या करून स्वत: विष पिऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले. यावेळी ठसे तज्ज्ञांसह प्रयोगशाळा तज्ज्ञांचाही चमू दाखल झाला होता. या प्रकरणी खरांगणा (मोरांगणा) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
पती-पत्नीच्या वादातून घडला थरार
सायंकाळी सात वाजले तरीही घराचे दार उघडले नसल्याने शेजाऱ्यांनी मृत कुंदनचा भाऊ संजय यांना माहिती दिली. तेही आंजीतच राहत असल्याने त्यांनी तत्काळ घर गाठले. घराचे दार वाजवून दोघांनाही आवाज दिला असता, काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पोलिस चौकीला कळविले असता, पोलिस कर्मचाऱ्यांनी येऊन सळाखीच्या सहाय्याने घराचे दार उघडले. तेव्हा घरातील बेडरूमध्ये दोघांचेही मृतदेह आढळले. यावेळी कुंदनचा मृतदेह दिवाणवर झोपलेल्या अवस्थेत तर शीतलचा मृतदेह जमिनीवरील गादीवर आढळला. तिच्या डोक्यातून रक्त निघाल्याचे दिसले. तसेच बाजूला रक्ताने माखलेला एक दगडही मिळाला. यासोबतच त्या खोलीमध्ये मोबाइलचे बिल आणि सीडीआरची प्रत दिसून आली. यावरून पोलिसांनी पती-पत्नीच्या वादातून ही घटना घडल्याचा अंदाज वर्तविला असून, परिसरातही तीच चर्चा आहे. घटनास्थळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक सागर कवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी गाेकुळसिंग पाटील, ठाणेदार संतोष शेगावकर, सूर्यवंशी, विनोद सानप, दीपक जाधव व अमर हजारे उपस्थित होते.
दोन्ही मुले मामाच्या गावी गेली, आई-वडिलांनी राहत्या घरातच जीवनयात्रा संपविली!
या दाम्पत्याला १३ वर्षांची मुलगी व ९ वर्षांचा मुलगा आहे. मुले मैत्री आणि सम्राट हे भाऊ-बहीण चार-पाच दिवसांपूर्वी धामनगाव (वाठोडा) येथे आपल्या मामाच्या गावी गेले होते. त्यामुळे घरात पती-पत्नी हे दोघेच होते. वडिलांनी आईची हत्या करून स्वत:ही जीवनायात्रा संपविल्याने आता दोन्ही मुले आई-वडिलांअभावी पोरकी झाली आहेत. त्यांच्यावर मोठे संकट कोसळले असून, त्यांनी टाहो फोडला.