मागण्यांकडे दुर्लक्ष : साहित्य, मनुष्यबळ पुरविण्यास असमर्थतावर्धा : महावितरणच्या वर्धा विभागात सुमारे दीड लाख ग्राहक आहेत. या ग्राहकांना सेवा देताना अभियंत्यांची दमछाक होते. अपूऱ्या व्यवस्थेमध्ये ही सेवा प्रदान करावी लागत असल्याने अडचणीचे ठरते. महावितरणकडून अभियंत्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जाते. यामुळे आता अभियंत्यांनीच महावितरणविरूद्ध एल्गार पुकारला आहे. ग्राहकांना उत्तम सेवा प्रदान करण्याकरिता बहुदा पहिल्यांदाच अभियंते आंदोलनाची तयारी करताना दिसताहेत.महावितरणचे वर्धा विभागात वर्धा, सेलू व देवळी असे तीन तालुके आहेत. या तीन तालुक्यांमधील सुमारे दीड लाख ग्राहकांना सेवा दिली जाते. महावितरणचे हे जाळे जुने असून जीर्ण झाले आहे. त्यातही नियमित सुव्यवस्था न झाल्याने ग्राहकांना सेवा पुरविणे कठीण झाले आहे. याबाबत प्रशासनाला मागणी करूनही विद्युत लाईनची सुव्यवस्था करण्यासाठी योग्य उपाययोजना केल्या जात नाही. तोकडे साहित्य उपलब्ध करून दिले जाते. यामुळे ग्राहकांना अखंडित विद्युत पुरवठा व उत्तम सेवा देणे अशक्य झाले आहे. अनियमित व खंडित वीज पुरवठ्यामुळे ग्राहकांचा रोष मात्र विभागीय तथा उपविभागीय अभियंत्यांवरच असतो. अनेकदा अभियंत्यांना शिवीगाळ व धक्काबुक्कीच्या प्रकारांनाही सामोरे जावे लागते. महावितरणने साहित्य व मनुष्यबळ पुरविल्यास लाईनची दुरूस्ती करून ग्राहकांना अखंडित सेवा देणे शक्य आहे; पण त्याकडे वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करतात. महावितरणने योग्य साहित्य व मनुष्यबळ पुरवावे, या मागणीसाठी सबआॅर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशन वर्धा यांनी एल्गार पुकारला आहे. महावितरणच्या इतिहासात पहिल्यांदाच ग्राहकांच्या उत्तम सेवेसाठी अभियंते आंदोलनाच्या तयारीत आहेत. याबाबत कार्यकारी अभियंत्यांना नोटीसही देण्यात आली आहे. शिवाय वर्धा विभागातील सुमारे ४० अभियंत्यानी साखळी उपोषण करण्याचाही निर्णय घेतला आहे. सध्या वर्धा विभागात हे आंदोलन होत असून कारवाई न झाल्यास सर्वच विभागात होणार आहे. ग्राहकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणारे महावितरण अभियंत्यांच्या आंदोलनाची दखल घेणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
ग्राहकांच्या उत्तम सेवेसाठी पहिल्यांदाच अभियंत्यांचा एल्गार
By admin | Published: September 21, 2015 1:53 AM