लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : वाळू भरलेला ट्रॅक्टर पकडल्यानंतर ट्रॅक्टर चालक व मालकाला पैशाकरिता धमकावून तत्कालीन ठाणेदारासह पाच पोलिस कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केली होती. पुलगावातील हे प्रकरण चांगलेच गाजले होते. याप्रकरणी पोलिसांविरुद्ध पोलिस अधीक्षकांकडे तक्रार देऊन आंदोलनही उभारण्यात आले होते. आजपासून उपोषण, २० रोजी करणार सामूहिक आत्मदहन पोलिसांच्या या गैरकृत्याबद्दल 'लोकमत'ने सातत्याने पाठपुरावा केला. अखेर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या चौकशीअंती दोन वर्षानंतर तत्कालीन ठाणेदारांसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने आता अटकेची टांगती तलवार कायम आहे.
पुलगाव येथील तत्कालीन पोलिस निरीक्षक शैलेश शेळके, सहायक फौजदार खुशालपंत राठोड, हवालदार जयदीप जाधव, महादेव सानप व गजानन गहूकर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
देवेंद्र प्रमोद ठाकरे (२९, रा. गुंजखेडा) यांच्याकडे ट्रॅक्टर व ट्रॉली असून यांच्या ट्रॅक्टरवर अमोल पंधरे (रा. गुंजखेडा) हा चालक होता. ६ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८ वाजता दरम्यान ठाकरे यांच्या घरी बांधकामातून शिल्लक राहिलेले वाळू एम.एच. ३२ टी.सी. ३९९ क्रमांकाच्या ट्रॅक्टरने ठाणेगाव येथील मंदिरात नेत होते. यादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने ट्रॅक्टर पकडून पुलगाव पोलिस ठाण्यात आणला. देवेंद्र आणि अमोल या दोघांनाही पोलिस ठाण्यात आणून त्यांच्याकडील मोबाइल व पर्स पोलिसांनी ताब्यात घेतले. सकाळी १० वाजताच्या सुमारास दोघांनाही पोलिस कोठडीत टाकले. त्यानंतर लगेच १० ते १५ मिनिटांनी सहायक फौजदार खुशालपंत राठोड यांनी दोघांनाही कोठडीतून काढून डीबी पथकाच्या खोलीत नेऊन बेदम मारहाण केली. त्यानंतर १ वाजता न्यायालयात हजर केल्यावर दोघांचीही पोलिस कोठडी रद्द करून जामिनावर सुटका करण्यात आली.
सुटका झाल्यावर देवेंद्रने त्याचा भाऊ शुभमला फोन करून घ्यायला बोलावले. त्यामुळे देवेंद्र व अमोल हे दोघेही जप्त केलेले मोबाइल व पर्स घेण्याकरिता फौजदार राठोड यांच्याकडे गेले असता 'अर्ध्या तासात ठाणेदार साहेब येणार आहे. तेव्हापर्यंत थांबा' असे सांगून थांबवून ठेवले. यावेळी पोलिस कर्मचारी जयदीप जाधव यांनी या दोघांनाही पुन्हा डीबी रूममध्ये नेऊन एक लाखांची मागणी केली. तेवढे पैसे नसल्याचे सांगितल्यावर ७० हजार तरी द्यावे लागणार नाही तर मार खावा लागणार असे सांगितले. परंतु पैसे नसल्याने देण्यास नकार दिल्यावर तत्कालीन ठाणेदार शेळके, राठोड व गजानन गहूकर यांनी डीबी रूममध्ये जाऊन दोघांना जबर मारहाण केली. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता दोघांनाही सोडून दिले.
घराकडे जाण्याकरिता निघाले असता जयदीप जाधव व महादेव सानप या पोलिस कर्मचाऱ्यांनी दोघांनाही बोलावून झालं गेलं विसरा, नाही तर वाईट होईल, असा दम दिला. निमुटपणे ऐकून दोघांनाही शुभम ठाकरे याने ग्रामीण रुग्णालयात नेले. तेव्हा डॉक्टरांनी परिस्थिती पाहून जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर केले. तेथे उपचार घ्यावा लागला. त्यामुळे विनाकारण पैशाकरिता बेदम मारहाण करणाऱ्या ठाणेदारासह त्यांच्या सहकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी देवेंद्र ठाकरे याने पोलिस अधीक्षकांकडे केलेल्या तक्रारीतून केली होती. पण, याप्रकरणी विभागांतर्गत कारवाई करून प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर गुरुवार, २६ सप्टेंबरला पुलगाव पोलिसांत तक्रार घेऊन तत्कालीन ठाणेदारांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पुलगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राहुल सोनवणे करीत आहे.
ठाणेदार शेकळे ठरले वादग्रस्त पुलगावमध्ये रुजू झाल्यापासून ठाणेदार शैलेश शेळके विविध कारणांनी चांगलेच वादग्रस्त ठरले होते. यासंदर्भात 'लोकमत'ने वृत्त प्रकाशित करून पुलगाव पोलिसांचा तत्कालीन गैरकारभार चव्हाट्यावर आणला. ट्रॅक्टर मालक व चालकाला मारहाण केल्याचे प्रकरण चांगलेच तापले होते. नागरिकांनी रस्त्यावर उतरून या प्रकरणाचा निषेध केला होता. अखेर तत्कालीन पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी ठाणेदार शेळके यांना मुख्यालयी अटॅच केले होते. आता चौकशीअंती गुन्हा दाखल झाल्याने या अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे वर्दीवरच डाग लावण्याचा प्रकार यांनी केल्याचे बोलले जात आहे