पाच दाम्पत्यांच्या काळजाचे तुकडे सुरक्षित परतले युद्धभूमीतून!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2022 05:25 PM2022-03-07T17:25:03+5:302022-03-07T17:34:58+5:30
आपला काळजाचा तुकडा सुखरूप घरी परतल्याने या भावी डॉक्टरांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे.
वर्धा : जिल्ह्यातील पाच तरुण-तरुणी युक्रेन देशात वैद्यकीय शिक्षणासाठी गेले होते. यात दोन तरुण, तर तीन तरुणींचा समावेश असून, रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध पेटल्याने हे पाचही भावी डॉक्टर युक्रेनमध्ये अडकले. त्यामुळे या पाचही भावी डॉक्टरांच्या कुटुंबीयांना त्यांची चिंता लागली असतानाच आता हे पाचही जण सुखरूप आपल्या मायदेशी परतले आहेत. तशी नोंद जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने घेतली असल्याचे सांगण्यात आले.
वर्धा येथील लविशा अनिल वलिच्छा, हिंगणघाट येथील यश विनोद मोटवाणी, सेलू येथील जान्हवी राहुल त्रिवेदी, पुलगाव येथील प्रणय सुरेश ताजणे, तर समीरण चंद्रशेखर काळे हे वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनमध्ये होते. त्यांचे वैद्यकीय शिक्षण सुरू असतानाच रशियाने युक्रेनवर हल्ला चढविला. त्यामुळे हे पाचही भावी डॉक्टर युक्रेन देशात अडकले. सुखरूप मायदेशी परतण्याची ओढ असलेल्या या पाचही भावी डॉक्टरांनी मोठे धाडस करून युक्रेनची बाॅर्डर पार केली. सेलूची जान्हवी ही युद्ध सुरू होण्यापूर्वीच आपल्या मूळगावी परतली असली, तरी युद्ध पेटल्याने तिच्या मित्र-मैत्रिणींचे काय होणार? अशीच चिंता तिला अजूनही सतावत आहे.
ऑपरेशन गंगा
युद्धामुळे युक्रेन देशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकारच्या वतीने ऑपरेशन गंगा ही मोहीम राबविली जात आहे. याच विशेष मोहिमेचा वर्धा जिल्ह्यातील चारही भावी डॉक्टरांना वेळीच मायदेशी परतण्यासाठी फायदाच झाला आहे. आपला काळजाचा तुकडा सुखरूप घरी परतल्याने या भावी डॉक्टरांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे.
मोठा धोका पत्कारून पार केली युक्रेनची बाॅर्डर
१) युद्ध पेटल्याने युक्रेनमध्ये प्रत्येक क्षणाला परिस्थिती बदलत आहे. सायरन वाजला की सुरक्षित ठिकाणी पळा, मिळेल ते खाऊन पोट भरा, अशीच परिस्थिती येथे आहे. अशाही परिस्थितीत स्वत:ला सावरत आम्ही युक्रेनची बॉर्डर पार केल्याचे हिंगणघाट येथील मूळ रहिवासी असलेल्या यश मोटवाणी याने सांगितले.
२) युद्धामुळे युक्रेनमध्ये परिस्थिती विदारकच आहे. रोमानियाच्या दिशेने प्रवास करीत असताना बॉर्डरपूर्वी अचानक माझी प्रकृती बिघडली. थंडीमुळे पायच गोठले होते. त्यामुळे आपण तुरकीश नामक रेस्टॉरंटमध्ये आश्रय घेतला. प्रकृतीत सुधारणा होताच युक्रेन-रोमानियाची बाॅर्डर पार केली. त्यानंतर आपली घरवापसी झाल्याचे पुलगावच्या समीरण काळे याने सांगितले.
३) युद्ध सुरू होण्यापूर्वी मी युक्रेन येथून आपल्या मायदेशी परतले असले, तरी येथील परिस्थिती टीव्हीवर बघताना अंगावर शहाराच उभा होत आहे. युद्धामुळे तेथील परिस्थिती क्षणाक्षणाला बदलत आहे. आपण सध्या आपल्या मायदेशी असले, तरी युक्रेनमधील आपल्या मित्र-मैत्रिणींचे काय होईल, अशीच चिंता सध्या सतावत असल्याचे जान्हवी त्रिवेदी हिने सांगितले.
युक्रेनमध्ये शिकत असलेले जिल्ह्यातील विद्यार्थी : ०५
युक्रेनमधून जिल्ह्यात परतलेले विद्यार्थी : ०५
परतीच्या प्रतीक्षेत असलेले विद्यार्थी : ००