वर्धा: गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आणि शस्त्र बाळगण्यासह दारूची विक्री करणाऱ्या पाच व्यक्तींना सहा महिन्यांकरिता हद्दपार करण्यात आले आहे. हा आदेश उपविभागीय न्याय दंडाधिकारी तथा उपविभागीय महसूल अधिकारी दीपक कारंडे यांनी निर्गमित केला आहे. वर्धा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रहिवासी सागर ज्ञानेश्वर घोडे रा. बोरगाव (मेघे), अक्षय दिगांबर पटले रा. सातपुते ले-आऊट, बोरगाव (मेघे), अज्जू वासुदेव राठोड रा. बोरगाव (मेघे), अमोल उर्फ बंटी महेंद्र शंभरकर रा. तारफैल व मनिष प्रसादीलाल ताराचंदी रा. आनंदनगर वर्धा यांच्याविरुद्ध वर्धा शहर पोलीस ठाण्यात घातक शस्त्र बाळगणे, दारू विक्री करणे आदी गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
त्यांच्याविरूद्ध वारंवार प्रभावी प्रतिबंधक कार्यवाही करूनही त्यांच्या वर्तणुकीत परिणाम न झाल्याने हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस विभागाने उपविभागीय न्याय दंडाधिकारी तथा उपविभागीय महसूल अधिकारी दीपक कारंडे यांच्याकडे सादर केला. त्या निर्णयावर उपविभागीय न्याय दंडाधिकाऱ्यांनी शिक्कामोर्तब केल्याने या सहा व्यक्तींना हद्दपारीच्या आदेशाची अंमलबजावणी करीत कारवाई करण्यात आली आहे. बोरगाव (मेघे), आनंदनगर व तारफैल भागातील रहिवासी असलेल्या सहा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. संबंधित व्यक्तींना पुढील सहा महिने वर्धा जिल्ह्यात प्रवेशबंदी राहणार आहे. ही व्यक्ती वर्धा जिल्ह्यात कुणाला दिसल्यास त्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना द्यावी. - कैलास पुंडकर, ठाणेदार, शहर, पोलीस स्टेशन, वर्धा.