वर्धा : पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी देवळी तालुक्यातील शिरसगाव (धनाडे) येथील विलास माधव भगत(५६) याला कलम ३२६ मध्ये पाच वर्षे सश्रम कारावास व २ हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास तीन महिने साध्या कारावासाची शिक्षा ठोठवण्यात आली. हा निकाल अति. सत्र न्यायाधीश अनिरूद्ध चांदेकर यांनी मंगळवारी दिला. थोडक्यात हकीकत अशी की, २१ मे २०१५ रोजी नामदेव डुकरे यांची मुलगी नलिनी भगत हिला तिचा पती विलास भगत याने २०० रुपये मागितले. तिने पैसे देण्यास नकार दिल्याने विलासने निलिमाला लोखंडी पावशीने चेहऱ्यावर व काठीणे डोक्यावर मारले. यात ती गंभीर जखमी झाली. याची तक्रार नामदेव डुकरे यांनी देवळी पोलिसात केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास केला. प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक खेडेकर यांनी पूर्ण करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. सदर प्रकरणी सहायक शासकीय अभियोक्ता विनय आर.घुडे यांनी एकूण ११ साक्षीदार तपासले. त्यांना पैरवी अधिकारी एएसआय विजय ढवळे यांनी सहाकार्य केले. सरकारतर्फे साक्षीपुरावे व युक्तिवादानंतर न्यायाधीश अनिरुद्ध चांदेकर यांनी निकाल दिला.(प्रतिनिधी) विनयभंगप्रकरणी आरोपीला अडीच वर्षे कारावास वर्धा : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी कारंजा तालुक्यातील नारा (हेटी) येथील प्रदीप मधुकर गजाम (२८) याला दोन कलमान्वये अडीच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. सदर निकाल येथील अति. सत्र व विशेष सत्र न्यायाधीश अंजली खडसे यांनी मंगळवारी दिला. घटनेची थोडक्यात हकीकत अशी की, ३० आॅक्टोबर २०१३ रोजी दुपारी प्रदीप गजाम याने पीडितेला बोलविले. याच दिवशी सायंकाळी तिला रस्त्यात अडवून तिच्याशी बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पीडिताने मैत्रिणीच्या सहायाने स्वत:ची कशीबशी सुटका करून घेतली. तिने या प्रकाराची माहिती पालकांना दिली. यावरून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपासाअंती प्रकरण न्यायप्रविष्ट केले. सदर प्रकरण न्यायालयात आले असता सहा. अभियोक्ता व्ही.एन. देशमुख यांनी शासनातर्फे एकूण सहा साक्षीदार तपासले. त्यांना पैरवी अधिकारी जमादार रमेश सावरकर यांनी सहाकार्य केले. साक्षीपुरावे व युिक्तवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश अंजली खडसे यांनी आरोपीला कलम ३५४ व मुलांचे लैंगिक छळापासून सरंक्षण कायदा २०१२ कलम १२ अन्वये प्रत्येकी अडीच वर्षे सश्रम कारावासाची व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा व दंड न भरल्यास सहा महिने सश्रम कारवासाची शिक्षा ठोठावली.(प्रतिनिधी)
मारहाणप्रकरणी पतीला पाच वर्षे सश्रम कारावास
By admin | Published: April 19, 2017 12:36 AM