वर्धा : लोकशाही दिनात दाखल होणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणींबाबत विभाग प्रमुखांनी तत्काळ चौकशी करून केलेल्या कारवाईबाबत संबंधितांना माहिती उपलब्ध करून द्या, अशा सूचना जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी दिल्यात. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित लोकशाही दिनात जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांनी जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांच्यासमोर तक्रारी मांडल्या. यावेळी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त जिल्हाधिकारी दीपक नलावडे, अति. मुख्य कार्यपालन अधिकारी प्रमोद पवार, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर आदी उपस्थित होते. कारंजा येथील सर्वसामान्य शेतकऱ्यांना पांदण रस्ता नसताना शेतातील पीक काढण्यास होणाऱ्या अडचणींची माहिती देतानाच दिवाकर माधवराव ठाकरे या शेतकऱ्याने गावातील पाणी वाहनू जाण्यासाठी नाली नसल्याने शेतातील पिकांची नासाडी होत आहे. यामुळे ग्रामपंचायतीच्या परिसरातून नालीचे बांधकाम करावे, अशी मागणी जिल्हाधिकारी सलील यांना निवेदनातून केली. रस्ता नसल्याने तीन वर्षांपासून होणारा त्रास दूर करणे या विनंती अर्जावर निर्णय देताना जिल्हाधिकारी सलील यांनी कारंजा तहसीलदारांनी पोलिसांची मदत घेत रस्ता मोकळा करण्याच्या सूचना दिल्यात. वर्धा शहरात महिलांसाठी शौचालय नसल्याने होणारी गैरसोय टाळून त्वरित शौचालयाचे बांधकाम करावे. याबाबत ताराचंद चौबे यांनी जिल्हाधिकारी यांना लोकशाही दिनात निवेदन दिले असता भाजीबाजार महाराष्ट्र बॅँकेच्या मागे तसेच तीन जागेवर शौचालय बांधकाम त्वरित पूर्ण करावे, अशा सूचना मुख्याधिकाऱ्यांना दिल्य. बुरड मोहल्ला व अशोक मोहल्ला या दोन ठिकाणी शौचालयाचे बांधकाम झाल्याचे सांगण्यात आले. यावेळी अन्य तक्रारींवरही चर्चा झाली.(कार्यालय प्रतिनिधी)
लोकशाही दिनातील तक्रारी तत्काळ सोडवा
By admin | Published: March 09, 2016 3:08 AM