वर्धा : शासकीय सेवेतील प्रत्येक चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला गर्व वाटेल असाच काहीसा नावीण्यपूर्ण उपक्रम सोमवारी जिल्हा परिषदेत 'हर घर तिरंगा' या उपक्रमाला केंद्रस्थानी ठेवून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आला.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी रोहन घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागात सेवा देणारे परिचर प्रमोद पुरी यांच्या हस्ते मिनी मंत्रालय अशी ओळख असलेल्या वर्धा जिल्हा परिषदेत सोमवारी ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी सूरज गोहाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे, अमोल भोसले तसेच जिल्हा परिषदेच्या चौदाही विभागाचे प्रमुख आणि अधिकारी तसेच धर्मेंद्र चव्हाण यांच्यासह आदी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
कोण आहेत प्रमोद पुरी?
प्रमोद पुरी हे जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागात परिचर म्हणून सेवा देत आहे. ते २५ सप्टेंबर १९९५ रोजी शासकीय सेवेत रुजू झालेत. मागील २८ वर्षांपासून ते जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासनात सेवा देत आहेत.
जनतेच्या मनात स्वातंत्र्याच्या स्मृती तेवत राहाव्या. स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतिकारक, स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे. देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी या उद्देशाने ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबविला जात आहे. आज मी जिल्हा परिषदेत ध्वजारोहण केले. हा माझ्या एकट्याचा नव्हे तर प्रत्येक चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याचा सन्मान आहे, असे मी समजतो.
- प्रमोद पुरी, परिचर, सामान्य प्रशासन, जि. प. वर्धा.