फसवणूक : ग्रा.पं. च्या ठरावातही खोडतोडवर्धा : तालुक्यातील तळेगाव (टा.) येथील एका इसमाच्या राहत्या घराचा काही भाग भलत्याच इसमाच्या नावे करण्यात आला. या प्रकारामुळे मूळ घरमालकाची फसवणूक झाली असून ते अडचणीत आले आहेत. या प्रकरणी चौकशी करून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी रामा मून यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. याबाबत त्यांनी लोकशाही दिनातही तक्रार केली होती.तळेगाव (टा.) येथील रामा परसराम मून यांच्या नावाने वॉर्ड क्रमांक एक येथे राहते घर व मोकळी जागा आहे. यात ३० जुलै २००७ रोजी पत्नीच्या नावाने आपसी वाटणीपत्र करण्यात आले. हे वाटणीपत्र ग्रामपंचायतीच्या ठरावाद्वारे फेरफार घेऊन करण्यात आले. असे असले तरी सदर ठरावामध्ये तत्कालीन सचिवांनी खोडतोड केली. यात गजानन विठ्ठल सुरकार यांच्या नावाने कुठलाही फेरफार व जागा नसताना २२ डिसेंबर २०१० व ३० डिसेंबर २०१० रोजी खोटा ठराव पारित करण्यात आला. याच खोट्या कागदपत्रांच्या आधारे घराच्या बांधकामाचा परवाना व नकाशालाही मंजुरी देण्यात आली आहे. सदर मंजुरी गजानन यांचे वडील विठ्ठल सूर्यभान सुरकार यांच्या नावाने देण्यात आलेली आहे. त्यांचे वॉर्ड क्रमांक एकमध्ये घर क्र. १३१ हे २५ बाय ३१ चौरस फुट आहे. त्यावर सिंडीकेट बँकेचे कर्ज घेतलेले आहे. विठ्ठल सुरकार यांच्या नावाने असलेल्या या घराचे एकूण क्षेत्रफळ २०३६ फुट दाखविण्यात आली आहे. शिवाय तेवढ्या जागेच्या बांधकाम व नकाशालाही मंजुरी देण्यात आली आहे. यात रामा मून यांच्या मोकळ्या जागेचाही समावेश केला आहे. याबाबत चौकशी करून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी निवेदनातून मून यांनी केली आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
खोट्या कागदपत्रावरून हडपली जमीन
By admin | Published: September 24, 2015 2:41 AM