बोर व्याघ्र प्रकल्पामध्ये बहार नेचर फाऊंडेशनच्या चमूने घेतली नोंदवर्धा : काळवीट हा शिंगधारी हरिण गटातील प्राणी भारतीय उपखंडातील रहिवासी आहे. काळविटाला २००३ पासून संकटग्रस्त प्रजाती म्हणून जाहीर करण्यात आले. बोर व्याघ्र प्रकल्प व जिल्ह्यातही काळविटाच्या वास्तव्याची नोंद नसल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले; पण बहार नेचर फाऊंडेशनच्या चमूला रोठा पुलगाव मार्गावर काळवीट आढळून आले. ही बाब वन्यजीवप्रेमींसाठी आनंद व आशादायी आहे.रोठा-पुलगाव मार्गावरील माळरान परिसरात एक नर व तीन माद्या, असे काळविटाचे कुटुंब गत काही दिवसांपासून वास्तव्यास असल्याची माहिती शेतकरी सतीश रोंघे यांनी दिली. या छोट्या कळपात यंदा एका नवजात पिलाचा समावेश झाल्याचेही रोंघे यांनी सांगितले. हा कळप केवळ गवत खात असल्याने शेतकऱ्यांना त्यांचा कोणताच त्रास नाही. यामुळे या भागातील शेतकरीही काळविटांना त्रास देत नाहीत. या कळपातील नर काळविटाला कॅमेऱ्यात टिपण्याची संधी किशोर वानखडे यांना मिळाली असून काळविटाची पहिली रितसर नोंद त्यांनी घेतली.बोर व्याघ्र प्रकल्प व जिल्ह्यातील वनक्षेत्रात काळविटाची पूर्वनोंद नसल्याची माहिती बोर व्याघ्र प्रकल्पाचे सहायक वनसंरक्षक उत्तम सावंत व प्रादेशिकचे वनपरिक्षेत्र अधिकारी बारई यांनी दिली. नोंद घेतलेले हरीण काळवीटच असल्याची खात्री वन्यजीव अभ्यासकांनी केली. निसर्गप्रेमी संजय इंगळे तिगावकर, पराग दांडगे व वन्यप्रेमींनी आनंद व्यक्त केला. काळवीटाच्या कळपाची योग्य काळजी घेतली जावी म्हणून बहार नेचर फाऊंडेशनच्यावतीने शेतकऱ्यांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
जिल्ह्यात आढळला काळविटांचा कळप
By admin | Published: July 16, 2015 12:14 AM