आनंद इंगोले
वर्धा : ‘दादा... जरा थांबा; आमच्याही घरापर्यंत चला ! सततच्या पावसानं आमचं होत्याचं नव्हतं झालं. घरात पाणी शिरल्याने भिंती पडल्या, घरामध्ये गाळ साचला आहे, घरातील जीवनावश्यक वस्तू भिजल्या असून, गॅस सिलिंडरही वाहून गेलं. त्यामुळे दोन वेळच्या जेवणाचीही अडचण झाली आहे, अशी आपबिती सांगत ‘स्वयंपाकाकरिता गॅस सिलिंडर तरी घेऊन द्या,’ अशी आर्त विनवणी महिलेने विराेधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे केली. अजित पवार यांनीही आपला ताफा थांबवून थेट महिलेचे घर गाठले. सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन उपस्थित अधिकाऱ्यांना मदतीकरिता सूचना केल्या आहेत.
वर्धा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पूरपरिस्थितीच्या नुकसानीची पाहणी करण्याकरिता विरोधी पक्षनेते अजित पवार शुक्रवारी वर्धा दौऱ्यावर आले होते. त्यांनी हिंगणघाट तालुक्यातील कानगाव, चानकी, मनसावळी व अलमडोह या भागाची पाहणी केली.
घरातलं सारं गेलं
यादरम्यानच कान्होली या गावापासूनही पवार यांचा ताफा जात असताना कान्होली येथील काही महिलांनी पुढे येऊन ‘दादा...जरा थांबा’ असा आवाज देताच ताफा थांबविण्यात आला. तेव्हा एका महिलेने ‘घरातील सारं काही गेलं, आमच्या घरातील गॅस सिलिंडरही वाहून गेल्याने आता स्वयंपाकाकरिता गॅस सिलिंडर तरी द्या, विश्वास बसत नसेल तर घरापर्यंत येऊन परिस्थितीची पाहणी करा,’ अशी विनंती केली. तेव्हा पवार यांनी लागलीच वाहनाखाली उतरून महिलेच्या घरापर्यंत जात सर्व परिस्थितीची पाहणी केली. त्यामुळे या महिलांनाही दिलासा मिळाला असून, तातडीने मदत देण्याचे निर्देश अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी आ. रणजित कांबळे, हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड. सुधीर कोठारी आदींची उपस्थिती होती.