लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : सुरुवातीला हुलकावणी दिलेल्या पावसाने जून, जुलै महिन्यात कहर केला. जिल्ह्यात विविध ठिकाणी अतिवृष्टी नोंदविण्यात आली होती. नुकसानग्रस्त ४० हजार शेतकऱ्यांसाठी ३६.९१ कोटींच्या निधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. शासनाने यास मंजुरी देत दिवाळीपूर्वी ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल, असे आश्वासनही दिले होते. मात्र दिवाळी संपूनही खात्यात निधी न जमा झाल्याने शासनाचा आर्थिक मदतीचा बार फुसका ठरल्याची प्रचिती शेतकऱ्यांना आली असून दिवाळीनंतरही नुकसानभरपाईची प्रतीक्षा लागली आहे.
जिल्ह्याला गेल्या दोन-तीन वर्षांपासून अतिवृष्टीचा सामना करावा लागतो आहे. यंदाही अस्मानी संकटाने शेतकऱ्यांना सोडले नाही. सुरुवातीला हुलकावणी देणाऱ्या पावसाने नंतरच्या काळात जोरदार हजेरी लावली. यात जिल्ह्यातील पाच तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली होती. यात ६६२ गावांतील ४० हजार ८६३ शेतकऱ्यांचे शेतपीक बाधित झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडून शासनाकडे पाठविण्यात आला होता. मधल्या काळात पावसाने विसावा घेतला खरा, मात्र ऐन काढणीच्या वेळेला परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने हातातोंडाशी आलेल्या घासावर पावसाने पाणी फिरविले.
शासनाने अतिवृष्टी नुकसानग्रस्तांना मदतीच्या घोषणेने किमान दिवाळी साजरी होणार, अशी शेतकऱ्यांनी अपेक्षा बाळगली होती. मात्र शासनाची ही घोषणा फुसका बार निघाल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच गेली. त्यानंतर विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्याने आचारसंहितेअभावी निधीला खोडा बसला. निवडणूक होईपर्यंत तसेच नवे सरकार स्थापन होईपर्यंत जिल्हा प्रशासनाला निधी उपलब्ध होण्याची शक्यता नाहीच्या बरोबर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नुकसानाच्या निधीचा मार्ग खडतर झाला असल्याचे दिसून येत आहे.
तालुकास्तरीय निधीची आवश्यकता अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे जुलै महिन्यात उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याच नुकसानग्रस्तांना दिलासा देण्यासाठी वर्धा तालुक्याला १ कोटी ३१ लाख ५५ हजार, सेलू तालुक्याला ५ कोटी ८१ लाख ८० हजार, देवळी तालुक्याला २ कोटी ५६ लाख ३७ हजार, आर्वी तालुक्याला १८ लाख ७५ हजार, कारंजा तालुक्याला ३ कोटी ९५ लाख ८८ हजार, हिंगणघाट तालुक्याला १८ कोटी ६७ लाख १७ हजार, समुद्रपूर तालुक्याला ४ कोटी ४० लाख २२ हजार रुपये निधीची आवश्यकता आहे.
अतिवृष्टीत बाधित झालेले क्षेत्र वर्धा ९६३.२९ हेक्टर सेलू ४२७२.३६ हेक्टर देवळी १८८५.११ हेक्टर आर्वी ११३५.६० हेक्टर कारंजा २९१०.२५ हेक्टर हिंगणघाट १३७२७.५५ हेक्टर समुद्रपूर ३२३६.९७ हेक्टर