खरांगणा (गोडे) येथे ग्रीन नेट शेडचे नुकसानसेवाग्राम : जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी झालेल्या वादळामुळे राजू महाकाळकर यांच्या शेतातील पॉली हाऊस जमिनदोस्त झाले. यासह त्यांच्या ग्रीन नेट शेडचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाली. यात संरक्षण भिंतसुध्दा कोसळली आहे. यात शेतकऱ्याचे सुमारे ६५ लाखांच्या नुकसानीचा अंदाज आहे. सकाळी आकाश स्वच्छ असताना दुपारी अचानक आभार दाटून आले. यावेळी आभाळासह वादळ आल्याने त्याचा फटका खरांगणा (गोडे) येथील शेतकऱ्याला बसला. येथे पावसासह सुसाट्याचा वारा सुरू झाला. या वाऱ्यामुळे राजू महाकाळकर यांच्या शेतातील पॉली हाऊस, ग्रीन नेट शेड आणि संरक्षण भिंत कोसळली. यात त्यांच्या एक एकरातील कारली आणि काकडीचे पीक उद्ध्वस्त झाले. ग्रीन नेट शेड एक एकरात आहे. यात टमाटर आणि दोडके लावण्यात आलेली आहे. ग्रीन नेट पूर्णपणे फाटली. शेताच्या समोरील भागाला गेट व उभारलेली ४०० फुटाची भिंत धराशाही झाली. आधुनिक पध्दतीच्या शेतीची कास धरणाऱ्या राजू महाकाळकर यांनी वर्धेच्या विजया बॅँकेकडून कृषी कर्ज घेतले. विमा सुध्दा काढला. आठ महिन्याअगोदर असेच नुकसान झाल्याचे महाकाळकर यांनी सांगितले. या नुकसानीची पाहणी करण्याकरिता जिल्हा कृषी विभागाचे नाडे, राठोड व मून, तलाठी एस. मानमोडे, बंडू सागर, विजया बॅँकेचे अधिकारी यांनी भेट देत झालेल्या नुकासनीचा पंचनामा केला.(वार्ताहर) कारली व काकडी पीकही गेलेराजू महाकाळकर यांनी त्यांच्या शेतात पॉली हाऊस उभारून काकडी व कारलीचे पीक घेतले होते. सध्या कारलीची तोडणी सुरू होती. तर काकडीचे पीक जोमात होते. मात्र गुरुवारी आलेल्या या वादळात त्यांच्या शेतातील पॉली हाऊस भूईसपाट झाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. यया नुकसानीची भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांकडून पाहणीझालेल्या नुकसानीची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी विभाग व संबंधीत अधिकाऱ्यांना मिळाली. त्यांनी या नुकसानीची पाहणी करून त्याचा पंचनामा केला. त्याचा अहवाल वरिष्ठांकडे सोपविण्यात येणार असल्याचे शेतकऱ्याला सांगण्यात आले आहे.
वादळामुळे शेतातील पॉली हाऊस जमीनदोस्त
By admin | Published: June 04, 2015 1:57 AM