वर्धा : सेलू नजीकच्या बेलगाव मार्गावर असलेला बोर नदीवरील बंधारा पाण्याने तुडुंब भरून असून पाण्यावर वाढलेल्या जलपर्णीसारख्या वनस्पतीने हिरवा शालू पांघरला असून, पाण्यावर फुलणाऱ्या पांढऱ्या, निळसर फुलांनी हा बंधारा आवागमन करणाऱ्यांना भुरळ घालत आहे. तसेच अनेक नागरिकांसाठी सेल्फी पाॅइंट बनल्याचे दिसून येत आहे.
नदीपात्राचा विस्तीर्ण परिसर या गालिचाने संपूर्णपणे झाकून गेला असून, सूर्य मावळतीच्या वेळात विलोभनीय दृश्य अनेकजण कॅमेराबद्ध करीत आहेत. कोरोनाच्या काळातही नदीकाठावर हे दृश्य पाहण्यासाठी गर्दी होत आहे. भर उन्हाळ्यापूर्वी या बंधाऱ्याचे नियोजन केले असल्याने बंधारा पाण्याने तुडुंब भरून आहे. या पाण्यामुळे परिसरातील विहिरींचा व सर्व जलस्रोतांना फायदा झाला आहे. नदीपात्रावर असलेल्या पुलावरूनच नागपूर ते तुळजापूर मार्ग आहे. यावरून जाणाऱ्या-येणाऱ्यांनाही हे दृश्य आकर्षित करीत असल्याचे दिसून येत आहे.