लोककलांचे सादरीकरण : हिंदी विद्यापीठातील कार्यक्रमवर्धा : येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात चंदन तिवारी यांचा लोकगीत गायनाचा कार्यक्रम होता. त्यांनी सादर केलेल्या लोकगीताने श्रोते मंत्रमुग्ध झाले. विद्यापीठाच्यावतीने नवप्रवेशित विद्यार्थ्यांकडून लोककला व सांस्कृतिक संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वर्धेतील कलाकारांसह १३ राज्यामधील लोकनृत्य सादर करण्यात आले. यात महाराष्ट्राची लावणी, मणीपुरी, छत्तीसगढी, कत्थक, राजस्थानी, बंगाली इत्यादी राज्यातील नृत्यांचा समावेश होता. वर्धेतील सहाव्या वर्गात शिकत असलेली संपदा हिचे नृत्य हे या कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले. कार्यक्रमाचे संयोजन विद्यार्थी कल्याण अधिष्ठाता अनिल कुमार राय यांनी केले. कार्यक्रमाचा प्रारंभ कुलसचिव डॉ. राजेंद्र प्रसाद मिश्र यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पाहुणे राष्ट्रभाषा प्रचार समितीचे प्रधानमंत्री प्रो. अनंतराम त्रिपाठी, आवासीय लेखक अरूणेश नीरन, विद्यार्थी कल्याण अधिष्ठाता प्रो. अनिल कुमार राय यांच्या हस्ते झाली. कार्यक्रमाला पोलीस उपअधीक्षक (गृह) आर.जी. किल्लेकर, विश्वविद्यालयाचे संयुक्त कुलसचिव पी.सरदार सिंह, विशेष कर्तव्य अधिकारी नरेंद्र सिंह यांच्यासह अध्यापक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी तसेच वर्धेतील गणमान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.(प्रतिनिधी)
लोकगायनाने श्रोते झाले मंत्रमुग्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2015 2:02 AM