वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी पहिल्यांदाच महिलेला संधी मिळाली आहे. अध्यक्ष म्हणून आशा बोथ्रा यांची निवड करण्यात आली, तर मंत्री म्हणून प्रदीप खेलूरकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
१९३६ मध्ये महात्मा गांधींनी सेवाग्राम आश्रमची स्थापना केली. त्यांच्या जाण्यानंतर सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या माध्यमातून आश्रमचे कार्य सुरू आहे. गांधींजीच्या स्नुषा निर्मला रामदास गांधी यांनीसुद्धा व्यवस्थापक म्हणून जबाबदारी सांभाळली असली तरी आश्रम प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी आशा बोथ्रा यांच्या रूपाने पहिल्यांदाच महिलेला स्थान मिळाले आहे. ही आश्रमाच्याही इतिहासातील ऐतिहासिक घटना म्हणावी लागेल.
सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी. आर. एन. प्रभू यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याने नवीन अध्यक्षांच्या निवडीची जबाबदारी सर्वसेवा संघाच्या अध्यक्षाकडे कार्यसमितीने सोपविली. यात सर्व संमतीने आशा बोथ्रा यांनी निवड करण्यात आली. १६ नोव्हेंबरला संचालक मंडळाच्या बैठकीत मंत्रिपदी प्रदीप खेलूरकर यांची निवड झाली आहे. सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानची १३ सदस्यांची कार्यकारिणी गठित करण्यात आली असून, अध्यक्षपदी आशा बोथ्रा, मंत्री प्रदीप खेलूरकर, सदस्य म्हणून चंदन पाल, शेख हुसेन, अविनाश काकडे, डॉ. सैमनाथ रोडे, प्रशांत नागोसे, चतुरा रासकर, शोभा कवाडकर, टी. आर. एन. प्रभू, गौरांग महापात्र, डॉ. ए. अण्णामलाई यांचा समावेश आहे.
सर्वसेवा संघाने माझ्यावर विश्वास दर्शवून जबाबदारी सोपविली आहे. गांधींजीचे आश्रम हे प्रेरणास्थळ आहे. याचा वारसा आम्हाला पुढे न्यायचा आहे. देशात जे दूषित वातावरण निर्माण झाले आहे, ते दूर करण्याचा प्रयत्न करू. सेवाग्राम आश्रम हे आध्यात्मिक केंद्र बनावे, गावांशी आश्रम जुळून राहावे, यासाठी सर्व मिळून काम करू.
- आशा बोथ्रा, नवनिर्वाचित अध्यक्ष, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान.