वर्धा : गावातील शाळेत खेळणाऱ्या मुलांना पाहण्यासाठी गेलेल्या दिव्यांग व गतिमंद अल्पवयीन मुलीच्या अगतीकतेचा फायदा घेत नराधमाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी अतिरिक्त विशेष जिल्हा न्यायाधीश-१ व्ही. टी. सूर्यवंशी यांनी आरोपीस पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
रघुनाथ गहरू लोखंडे (७०) रा. तळेगांव (श्याम पंत) असे आरोपीचे नाव आहे. जन्मापासून दिव्यांग व गतिमंद असलेली पीडिता २४ ऑगस्ट २०१७ रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास आईसोबत शाळेच्या पटांगणात लहान मुलांचा खेळ बघण्याकरिता गेली होती. त्यानंतर तिला पटांगणात सोडून तिची आई घरी परतली. यादरम्यान आरोपी रघुनाथ लोखंडे याने पीडितेला आपल्या घरात नेऊन तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला.
यादरम्यान पीडितेची आई तिला शोधत आरोपीच्या घरापर्यंत पोहोचली असता, तिच्या ओरडण्याचा आवाज आला. तेव्हा हा सर्व प्रकार लक्षात येताच आरडाओरडा झाल्यावर नागरिकांनी आरोपीच्या घरासमोर गर्दी केली. त्यांना व तिच्या वडिलांना या घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर सर्वांनी तळेगाव येथील पोलीस ठाण्यात जावून तक्रार नोंदविली. याप्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधाकर चव्हाण यांनी करून सबळ पुराव्यानिशी आरोपीला अटक करून गुन्हा दाखल केला.
दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केल्यानंतर न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांनी साक्षीदार तपासून व दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपी रघुनाथ लोखंडे याला पाच वर्षांचा सश्रम कारावास, पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. यासोबतच दंडाच्या रकमेतून साडेचार हजार रुपये पीडितेस नुकसानभरपाई देण्याचाही आदेश दिला. सरकारतर्फे शासकीय अभियोक्ता ॲड. विनय घुडे यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी वैशाली ठाकरे यांनी सहकार्य केले.