अरविंद काकडे।आॅनलाईन लोकमतवर्धा : जिल्ह्यात दारूबंदी असली तरी पाट वाहतात, हे सर्वश्रूत आहे. नाले, नदीच्या काठावर, झुडपांत तथा जंगलात गावठी दारूच्या भट्ट्या लागतात. यावर पायबंद घालण्यासाठी आता जंगलात हातभट्टी दिसल्यास थेट वनरक्षकालाच जबाबदार मानून निलंबनाची कारवाई होणार आहे. तत्सम आदेशही उपवनसंरक्षकांनी जिल्ह्यातील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना दिल्यामुळे वनरक्षकांची भंबेरी उडाली आहे.जंगलातील नदी, नाल्याकाठी पाण्याचे कृत्रिम स्त्रोत निर्माण करून हातभट्ट्या लावल्या जातात. यामुळे उपवनसंरक्षक दिगांबर पगार यांनी हा निर्णय घेतला. जिल्ह्यातील एकूण हातभट्ट्यांपैकी ६०-७० टक्के हातभट्ट्या जंगलात धगधगतात. यात सागवृक्षासह इतरही वृक्षांची कत्तल केली जाते. हा गैरप्रकार दिसूनही एकटा वनरक्षक कारवाई करू शकत नव्हता; पण आता थेट निलंबनाची कारवाई होणार असल्याने वनसंरक्षकांवर मोठी जबाबदारी आली आहे. क्षेत्र सहायक व वनपरिक्षेत्र अधिकारी यांना याबाबत माहिती मिळाल्यास त्यांनीही दखल घेत हातभट्टीवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. पोलीस, दारूबंदी उत्पादन शुल्क विभाग, गुन्हे शाखा आणि ठाणेदार, उपविभागीय पोलीस अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांची दारूबंदीसाठी काम करणारी स्वतंत्र यंत्रणा आहे. आता याला वनविभागाची जोड मिळाल्याने अवैध दारूबंदीला यश येईल काय, हा विषय औत्सुक्याचा ठरत आहे.यापुढे जंगलात हातभट्टी आढळून आली तर त्याची सर्व जबाबदारी वनरक्षकाची राहील. यात कुचराई केल्यास निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे. तसे आदेश प्राप्त झाले आहेत.- पी.एम. वाडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, हिंगणी.