वर्धा : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असताना महाविकास आघाडीच्या उमेदवारीचा तिढा सुटत नव्हता. शुक्रवारी सायंकाळी काँग्रेसचे आर्वीचे माजी आमदार अमर काळे यांनी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश घेतला. त्यानंतर शनिवारी सायंकाळी मुंबई येथे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काळे यांना वर्धेतून उमेदवारी जाहीर केली आहे.
महायुतीत वर्धेची जागा भाजपच्या वाट्याला, तर महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला आली आहे. भाजप, वंचितने अधिसूचना निघण्यापूर्वीच उमेदवारांची घोषणा केली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवार जाहीर केला नव्हता. दुसरीकडे काँग्रेसच्या स्थानिक पुढाऱ्यांनी ही जागा आपल्याकडे कायम ठेवण्यासाठी मुंबई, दिल्लीपर्यंत प्रयत्न केले होते. राष्ट्रवादीतही उमेदवारीसाठी चढाओढ सुरू होती. काही दिवसांपासून काँग्रेसचे आर्वीचे माजी आमदार अमर काळे यांनीही ‘तुतारी’वर लढण्याची तयारी सुरू केली होती. त्यांनी आठवडाभरापूर्वीच मुंबईत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदींची भेट घेतली होती. मात्र, त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेतला नव्हता. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीविषयी संभ्रम निर्माण झाला होता.
शुक्रवारी सायंकाळी अमर काळे यांना मुंबई येथे शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षात प्रवेश दिला. त्यानंतर शनिवारी सायंकाळी मुंबई येथे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अमर काळे यांना वर्धा लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले. त्यामुळे आता महायुतीचे रामदास तडस आणि महाविकास आघाडीचे अमर काळे यांच्यात चुरशीचा सामना रंगण्याची शक्यता आहे. पहिल्यांदाच नसणार काँग्रेसचा उमेदवारवर्धा लोकसभा मतदार संघात यावेळी पहिल्यांदाच काँग्रेसचा उमेदवार नसणार आहे. या मतदार संघात आत्तापर्यंत काँग्रेस विरोधात इतर पक्ष लढत आले आहे. त्यात पहिल्यांदा कम्युनिस्ट आणि नंतर भाजपच्या उमेदवारांनी काँग्रेस उमेदवाराला पराभूत केले. मात्र, प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराने लढत दिली होती. दरम्यान, २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडी अस्तित्वात आली. ही आघाडी लोकसभेतही कायम आहे. आघाडीत वर्धा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला गेल्याने यंदा प्रथमच काँग्रेसच्या उमेदवाराशिवाय निवडणूक होणार आहे. मात्र, राष्ट्रवादीचे उमेदवार काँग्रेसचेच माजी आमदार आहेत.