लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वीज दरवाढ काही तीन-चार महिन्यांमध्ये झालेली नाही. याला माजी ऊर्जामंत्रीच जबाबदार आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात वीजदर भरमसाठ वाढविल्याने ग्राहकांना झळ सोसावी लागत आहे. आधीच दर नियंत्रणात ठेवले असते तर आता माजी ऊर्जामंत्र्यांसह भाजपाला भीक मांगो आंदोलन करण्याची गरज पडली नसती, असे मत ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पत्रपरिषदेत माध्यम प्रतिनिंधीच्या प्रश्नांना उत्तर देताना व्यक्त केले.ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे मंगळवारी वर्धा दौऱ्यावर आले होते. यादरम्यान आयोजित पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार सुरेश देशमुख, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस किशोर माथनकर, प्रा. दिवाकर गमे यांची उपस्थिती होती. लॉकडाऊनच्या कालावधीत उद्योग, कारखाने बंद असल्याने महावितरणलाही आर्थिक फटका बसला आहे. याही परिस्थितीत महावितरणच्यावतीने सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी बजावत सुरळीत विद्युत पुरवठा सुरू ठेवला आहे. ग्राहकांच्या सर्व अडचणी तत्काळ सोडविण्यासाठी कंट्रोल रूमचीही व्यवस्था करण्यात आली असून ग्राहकांना काही समस्या असेल तर त्यांनी कंट्रोल रूमला भेट द्यावी, आलेल्या ग्राहकांचे सर्व अधिकाऱ्यांनी समाधान करावे, अशा सूचनाही महावितरणला दिल्याचे तनपुरे यांनी यावेळी सांगितले.
तीन टप्प्यांची सवलतकोविड-१९ च्या महामारीत अनेकांचे रोजगार गेले आहे. त्यामुळे नागरिकांपुढे आर्थिक संकट गडद आहे. पण, महावितरणकडून सर्वांना योग्य रिडिंगनुसारच देयके देण्यात आली आहेत. रिडिंगमध्ये काही गडबड असल्यास त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन शंकांचे निरसण करून घ्यावे. सोबतच आलेले देयक एकमुस्त भरणे शक्य नसतील तर त्यांना तीन टप्प्यात वीज देयक भरण्याची सवलत देण्यात आली आहे, असेही ना. प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.
...तर आम्हीही भीक मांगो आंदोलन करावे का?कोरोनाच्या महामारीमुळे सारेच संकटात सापडले आहेत. राज्य शासनाचीही आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे. पण, सर्वांना न्याय देण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू असून यात कोणतेही राजकारण आम्हाला करायचे नाही. आता वीज दरवाढीबाबत भाजपकडून भीक मांगो आंदोलन केले जात आहे. सध्या देशात पेट्रोल-डिझेलचेही दर भरसाठ वाढत आहे म्हणून आम्हीही भीक मांगो आंदोलन करावे का? असा प्रश्न ना. तनपुरे यांनी पत्रपरिषदेत उपस्थित केला.