काँग्रेसमधील गटबाजीमुळे अशोक शिंदेंचा ‘ना’राजीनामा; दीड वर्षातच पक्षाला ठोकला रामराम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 11:26 AM2023-03-24T11:26:07+5:302023-03-24T11:29:46+5:30
पत्रपरिषदेत माहिती : माजी राज्यमंत्री अशोक शिंदेंचा रामराम
वर्धा : शिवसेना पक्ष सोडून तब्बल दीड वर्षापूर्वी काँग्रेस पक्षात दाखल झालेले ज्येष्ठ नेते तथा माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांनी काँग्रेस पक्षातील गटबाजीला त्रस्त होऊन काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय जाहीर केला. त्यांनी प्रदेशाध्यक्षांकडे राजीनामा देखील पाठविल्याची माहिती २३ रोजी आयोजित पत्रपरिषदेत दिली.
दीड वर्षापूर्वी कार्यकर्त्यांच्या सहविचाराने मी शिवसेना पक्ष सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. माझा पक्ष प्रवेश दिल्लीत होणार होता पण, तांत्रिक कारणामुळे मुंबईत झाला. त्यानंतर मला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्र राज्य कमिटीचे उपाध्यक्ष पद देण्याचे ठरविले. पण, तसे झाले नाही. हे पद अमरावती येथील डॉ. सुनील देशमुख यांना दिले. तत्कालीन पालकमंत्री सुनील केदार, आमदार रणजित कांबळे, चारुलता टोकस यांना हिंगणघाट विभागातील कामाच्या याद्या दिल्या. २५/ १५ च्या कामांची यादी दिली. विविध कार्यक्रम घेतले मात्र, जिल्ह्यातील गटबाजीमुळे ही सर्व कामे परस्पर इतरांना दिली.
गटबाजीमुळे काँग्रेस पक्षाला ग्रासले असून याला जिल्ह्यातील पदाधिकारी कारणीभूत आहेत, असा आरोप अशोक शिंदे यांनी केला. माझ्या कार्याची दखल तर घेतलीच नाही शिवाय माझा सोशल रिस्पेक्टही हिरावून घेतला यामुळे मी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असून माझ्यासह समुद्रपूर तालुक्यातील कार्यकर्ते तसेच जवळपास एक हजारांवर कार्यकर्त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे अशोक शिंदे यांनी सांगितले.