आनंद इंगोले
वर्धा : भारतीय जनता पार्टीच्या वर्धा शहर व ग्रामीण मंडळातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आमदार डॉ. पंकज भोयर यांनी कार्यकर्त्यांसंदर्भात अपशब्द वापरले, असा आरोप माजी खासदार सुरेश वाघमारे यांनी केला. या घटनेला आठ दिवसाचा कालावधी झाला तरीही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी कोणतीही दखल घेतली नसल्याने त्यांनी भाजप जिल्हा कार्यालयात शनिवारी दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आत्मक्लेश आंदोलन करण्याचा निर्णय फेसबूक लाईव्हमधून जाहीर केल्याने राजकीय खळबळ उडाली आहे.
भाजपाचे माजी खासदार सुरेश वाघमोर यांनी शुक्रवारी पत्रकारांशी चर्चा करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यामध्ये ‘वर्ध्यात २ सप्टेंबरला भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत आमदार डॉ. पंकज भोयर यांनी नागपुरला जाणाऱ्या कार्यकर्त्यांच्या संदर्भात अपशब्द वापरले असून त्यांचे हे वर्तन चुकीचे आहे. भाजपने नेहमीच कार्यकर्त्यांचा आदर केला आहे. कार्यकर्ते ही भाजपच्या रथाची चाके असून त्यांच्यामुळेच पक्ष आघाडीवर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा सामान्य कार्यकर्त्यांचा मान राखतात. परंतु आमदारांकडून याच कार्यकर्त्यांना असे शब्द वापरणे योग्य नाही, त्यांनी याबद्दल कोणतीही खंत व्यक्त केली नाही, असेही माजी खासदार सुरेश वाघमारे म्हणाले.
यासंदर्भात जिल्हाध्यक्ष गफाट यांना माहिती असून आठ उलटूनही कोणताच ठोस निर्णय घेतला गेला नसल्यामुळे कार्यकर्त्यांच्या सन्मानाकरिता हा निर्णय घ्यावा लागत असल्याचेही ते व्हिडिओमध्ये म्हणाले आहे. यावरुन भाजपात खदखद सुरु असून पुढे काय होते, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.कार्यकर्ता हाच पक्षाची ताकद आहे. त्यांच्या भरोवशावरच मी आमदार झालो आहे, याची जाणीव मला आहे. त्यामुळे कोणत्याही कार्यकर्त्यांना दुखावणे माझ्या स्वभावातच नाही. मी कार्यकर्त्यांबद्दल अपशब्द वापरले नाही. काही कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरुन एका पदाधिकाºयाबद्दल बोललो, बस इतकचं. याता याचा कोण कसा अर्थ काढावा, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.डॉ. पंकज भोयर, आमदार, वर्धा.