वर्धा : गोपनीय माहितीच्या आधारे वर्धा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासमोरून बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या चौघांना ताब्यात घेतले आहे. या कारवाई दरम्यान वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आरोपींकडून बिबट्याची कातडी जप्त केली आहे. जप्त करण्यात आलेल्या बिबट्याच्या कातडीची नेमकी किंमत किती हे अजूनही स्पष्ट करण्यात आले नसले तरी या कातडीचा लाखाेंमध्येच सौदा करण्यात आला होता, असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या आतापर्यंतच्या चाैकशीत पुढे आले आहे.
वन्यजीवांच्या कातडीची तस्करी करणाऱ्यांचा मोठा व्यवहार वर्धा शहरातील सिव्हील लाईन भागात होणार असल्याची माहिती नागपूर येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर नागपूर येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती तातडीने वर्धा येथील उपवनसंरक्षक शेपट यांना दिली. माहिती मिळताच वर्धा वनविभागातील अधिकारी व कर्मचारी अलर्ट मोडवर आले. त्यानंतर वर्धा शहरातील सिव्हील लाईन भागातील विविध परिसरावर वर्धा वनपरिक्षेत्र अधिकारी रुपेश खेडकर यांच्या नेतृत्वात वनविभागाच्या चमूंद्वारे पाळत ठेवण्यात आली.
दरम्यान, काही व्यक्तींवर संशय आल्याने त्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडील साहित्याची पाहणी केली असता बिबट्याची कातडी मिळून आली. ती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केली आहे. या प्रकरणात वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वकील अहमद शेख (४१) व महेंद्र अशोक आत्राम (४५, दोन्ही रा. वर्धा) तसेच दिलीप कुरसंगे (५३) आणि विनायक टिवलुजी मडावी (दोन्ही रा. चंद्रपूर) यांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. तर या प्रकरणात आणखी दोन व्यक्तींचा समावेश असून त्यांचा शोध वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून घेतला जात आहे.
शिकार नेमकी झाली कुठे?
या प्रकरणात आरोपींकडून बिबट्याची कातडी जप्त करण्यात आली आहे. असे असले तरी या बिबट्याची शिकार नेमकी कुणी व कुठे केली यासह विविध बाबींची माहिती सध्या वनविभागाचे अधिकारी घेत आहेत.
गोपनीय माहितीच्या आधारे बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपी असून त्यांचा शोध घेतला जात आहे.
- रुपेश खेडकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, वर्धा.