आमदारांची माहिती : अर्थसंकल्पात ५२.८० कोटींची तरतूद वर्धा : वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था तोकडी पडत आहे. यामुळे रस्त्यांचे रूंदीकरण गरजेचे आहे. या बाबीचा पाठपुरावा करीत निधी प्राप्त केला असून शिवाजी चौक ते जुनापाणी व धुनिवाले मठ चौकापर्यंत रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येत आहे. यात रस्ता सौंदर्यीकरणावरही भर दिला जाणार असल्याची माहिती आ. डॉ. पंकज भोयर यांनी दिली. राज्याच्या अर्थसंकल्पात या रस्त्यांसाठी ५२ कोटी ८० लाखांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. यातील शिवाजी चौक ते जुनापाणी चौकाच्या चौपदरी सिमेंटीकरणासाठी ३५ कोटी तर शिवाजी चौक ते धुनिवाले मठ चौकापर्यंतच्या रस्त्याला पाच कोटींचा निधी देण्यात आला आहे. आ.डॉ. भोयर यांनी पाठपुरावा करून हा मंजूर करून घेतला. शिवाजी चौक ते जुनापाणी चौक या तीन किमी अंतरात सिमेंटीकरण, नाली, फुटपाथ, पथदिवे व दुभाजक ही कामे होणार ओह. शिवाजी चौक ते धुनिवाले मठापर्यंत डांबरीकरण व मजबुतीकरण, फुटपाथ निर्मिती, नाली बांधकाम, पथदिवे, दुभाजक ही कामे होत आहे. सेलू तालुक्यातील झडशी येथील रस्त्याचे सिमेंटीकरण, नाली, फुटपाथ, पथदिवे या कामांना एक कोटी मंजूर करण्यात आले आहे. येळाकेळी येथील पुलापासून गावापर्यंतच्या रस्त्याचे सिमेंटीकरण, नाली, पथदिवे या कामांकरिता एक कोटी रुपये मंजूर झाले आहेत. महाकाळ-येळाकेळी रस्त्याचे सिमेंटीकरण, नाली व फुटपाथ यासाठी दोन कोटी रुपये मंजूर झाले. सुरगाव येथील रस्त्याचे सिमेंटीकरण, नाली, पथदिव्यांना एक कोटी रुपये, रिधोरा-झडशी रस्ता मजबुतीकरण व गावातील रस्त्यांचे सिमेंटीकरणासाठी दीड कोटी, गरमसूर-धोतीवाडा रस्ता व पुलाचे बांधकाम ७५ लाख रुपये, खैरी (मेणखत) ते नानबर्डी रस्ता दुरूस्ती ७५ लाख रुपये अशा एकूण ४८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सेलू-धोंडगाव रस्ता बांधकामासाठी ६९ लाख ९२ हजार रुपये, वर्धा-सिंदी (मेघे)-उमरी रस्त्याच्या बांधकामाला १ कोटी २२ लाख ६५ हजार रुपये, झडशी-गरमसूर रस्ता बांधकामासाठी १ कोटी २१ लाख ८० हजार रुपये, राष्ट्रीय महामार्ग ३६१ कान्हापूर ते वाहितपूर रस्त्याच्या बांधकामासाठी १ कोटी ९ लाख ४६ हजार रुपये, राज्य महामार्ग ३६१ ते ब्राह्मणी रस्ता बांधकामाकरिता ५६ लाख २ हजार रुपये अशा एकूण ४ कोटी ७९ लाख ८५ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
शहरातील दोन प्रमुख मार्गांचे होणार चौपदरीकरण
By admin | Published: March 23, 2017 12:34 AM