वर्धा :
गावात एकत्र खेळणारे, बागडणारी चार अल्पवयीन मुले अचानक सायंकाळच्या सुमारास गावातून बेपत्ता झाली. ही घटना सेलू तालुक्यातील मसाळा गावात शनिवारी रात्रीच्या सुमारास उजेडात आली. मुले बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली असून रात्रभर पाेलीस कुमक आणि नागरिकांनी रात्र जागून काढली. याप्रकरणी सेलू पोलिसांनी रात्री उशिरा अपहरणाचा गुन्हा दाखल केला. पप्पू देवढे (१३), राज येदानी (१३), राजेंद्र येदाणी(१२), संदीप भुरानी (०८) अशी बेपत्ता झालेल्या मुलांची नावे आहे.
शनिवारी सकाळच्या सुमारास मनोज मुंगसाजी देवढे याने त्याचा मुलगा पप्पू देवढे याला शाळेतून घरी आणले आणि तो शेतात कामावर निघून गेला. सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास मनोज काम आटोपून घरी आला असता त्याला पप्पू घरी दिसुन आला नाही. अंधार पडत असल्याने मनोजने पप्पूचा गावात शोध घेतला असता त्याचे तीन मित्र देखील गावातून बेपत्ता असल्याची त्याला माहिती मिळाली. दरम्यान चारही मुलांचे आई वडिल शोधात निघाले. मात्र, कुठेही ती मुले मिळून न आल्याने घरच्यांनी सेलू पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी तत्काळ या घटनेची दखल घेत मसाळा गाव गाठून पंचनामा करुन अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी दिली.रात्रभर ‘एसपीं’चा गावात मुक्काममसाळा गावातून चार अल्पवयीन मुलं बेपत्ता झाल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरताच. पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक संजय गायकवाड तसेच आदी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी थेट सेलू नजीकच्या मसाळा गावात भेट दिली. गावातील परिरसरात तसेच जंगल परिसरात रात्रभर शोध मोहीम राबविली. मात्र, मुलांचा कुठेही थांगपत्ता लागला नाही.