महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : कोविडचा नवा प्रकार असलेल्या ओमायक्रॉन हा उत्परिवर्तीत विषाणू डेल्टा पेक्षाही झपाट्याने आपला प्रसार करीत असल्याने विदेशातून परतणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ट्रेस करून त्याची आरटीपीसीआर कोविड चाचणी करून त्याला विलगीकरणात ठेवले जात आहे. परंतु, वर्धा जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या व विदेशवारीकरून परतलेल्या ७५ पैकी तब्बल चार व्यक्ती अजूनही वर्धा जिल्ह्याबाहेरच असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. तशी नाेंद आरोग्य विभागाने घेतली आहे.वर्धा जिल्ह्यातील मुळ रहिवासी असलेले ७५ व्यक्ती आतापर्यंत विदेशवारी करून परतल्याची माहिती आरोग्य विभागाला प्राप्त झाली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन या सर्व व्यक्तींची आरटीपीसीआर कोविड चाचणी करून त्यांना विलगीकरणात ठेवण्यासाठी प्रत्यक्ष कार्यवाही करताना ७५ पैकी चार व्यक्ती वर्धा जिल्ह्यात परतल्याच नसल्याचे पुढे आले आहे. विदेशवारी करून वर्धा जिल्ह्यात न परलेल्यांपैकी दोन व्यक्ती सध्या नागपूर, तर प्रत्येकी एक व्यक्ती मुंबई आणि यवतमाळ जिल्ह्यात असल्याचे सांगण्यात आले. या सर्व व्यक्तींची कोविड चाचणी अहवाल निगेटिव्ह आला असला तरी त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे विदेशवारीकरून परतलेल्यांपैकी तब्बल १८ व्यक्तींचा विलगीकरण कालावधी पूर्ण झाल्याने व त्यांच्यात कोविडची कुठलीही लक्षणे नसल्याने त्यांना मुक्त करण्यात आले.
२८ व्यक्तींचे घेतले दुसऱ्यांदा स्वॅब- विदेशवारीकरून परतणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची विमानतळावरच आरटीपीसीआर कोविड चाचणी केली जात आहे. असे असले तरी खबरदारीचा उपाय म्हणून विदेशवारी करून जिल्ह्यात परतलेल्या व्यक्तींचा २४ तासांच्या आता स्वॅब घेऊन तो आरटीपीसीआर कोविड चाचणीसाठी पाठविल्या जात आहे. आतापर्यंत विदेशवारीकरून परतलेल्या ७५ व्यक्तींचा पहिल्यांदा तर तब्बल २८ व्यक्तींचा दुसऱ्यांदा स्वॅब घेऊन कोविड चाचणीसाठी पाठविण्यात आला आहे. या सर्व व्यक्तींचे कोविड चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
आठव्या दिवशी घेतला जातो दुसरा स्वॅब- केंद्र व राज्य शासनाच्या सूचनांना केंद्र स्थानी ठेरून विदेशवारी करून परतलेल्या व विलगीकरणात असलेल्या व्यक्तींचा विलगीकरण कालावधीच्या आठव्या दिवशी दुसऱ्यांदा स्वॅब घेऊन तो आरटीपीसीआर कोविड चाचणीसाठी पाठविला जात आहे. आतापर्यंत तब्बल २८ व्यक्तींचे दुसऱ्यांदा स्वॅब घेऊन कोविड चाचणीसाठी पाठविण्यात आले असून, या सर्व व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
विदेशवारीकरून परतलेल्यांपैकी दोघे नागपूर तर प्रत्येकी एक यवतमाळ व मुंबई जिल्ह्यात आहेत. त्यांची कोविड चाचणी निगेटिव्ह आली असली तरी त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. ओमायक्रॉनचे संकट मोठे असून, कोविड मृत्यू रोखण्यासाठी लस उपयुक्त असल्याने नागरिकांनी नजीकच्या केंद्रावर जाऊन कोविडची व्हॅक्सिन घ्यावी.- डॉ. प्रवीण वेदपाठक, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा