लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मध्यभारतात अवयवदान शस्त्रक्रियांची मुहूर्तमेढ करणाऱ्या दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थेच्या सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात मंगळवारी चौथ्यांदा अवयवदानाची प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली आहे. यावेळी, नागपूरच्या रुग्णालयासोबतच सावंगी मेघे रुग्णालयातही अवयव प्रत्यारोपण करण्यात आले.आर्वी तालुक्यातील धनोडी बहाद्दरपूर येथील रहिवासी असलेले सुनील शंकरराव शेराम या ३३ वर्षीय विवाहित तरूणाचा रविवार दि. ३ जून रोजी अपघात झाला. त्या अपघातात त्याच्या मेंदुला जबर मार बसला. सुनीलला बेशुद्धावस्थेतच सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात न्यूरो सर्जरी विभागात भरती करण्यात आले. सुनीलवर उपचार करणारे न्यूरोसर्जन डॉ. संदीप इरटवार, डॉ. हेमंत देशपांडे व डॉ. अमोल सिंघम यांनी तपासणी केली असता त्याचा मेंदु मृताअवस्थेत असल्याचे आढळले. त्यांनी कोणत्याही परिस्थितीत सुनीलचे प्राण वाचण्याची शक्यता नसल्याचे परिवारातील सदस्यांना सांगितले. यावेळी डॉ. इरटवार व डॉ. देशपांडे यांनी अवयवदानाबाबतही माहिती दिली व सुनील इतर गरजू व्यक्तींना जीवनदान देऊ शकतो, याची जाणीव करून दिली. सुनीलच्या परिवारातील सदस्यांनी परोपकाराची भावना जोपासत आणि आपला जीवलग अन्य व्यक्तींच्या रूपात जिवंत राहील, या भावनेने अवयवदानाला संमती दिली. परिवाराची अवयवदानासाठी लेखी स्वीकृती मिळाल्यावर सावंगी (मेघे) रुग्णालयायाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रशेखर महाकाळकर व समन्वयक डॉ. रूपाली नाईक यांनी विभागीय प्रत्यारोपण समितीशी संपर्क साधून अवयवदानासाठी आवश्यक शस्त्रक्रिया सावंगी रुग्णालयात पार पाडण्यात आली. त्यानंतर अवयव सुरक्षितरित्या स्थानांतरीत करण्यासाठी ग्रीन कॉरीडॉर निर्माण करीत सुनीलचे यकृत (लिव्हर) नागपूरच्या वोक्हार्ट रुग्णालयाकडे सोपविण्यात आले तर एक मूत्रपिंड (किडनी) आॅरेंज सिटी रुग्णालयाकडे सुपूर्त करण्यात आले. याशिवाय, एक किडनी व दोन डोळ्यांचे प्रत्यारोपण सावंगी मेघे रुग्णालयाच करण्यात आले. या प्रक्रियेत शल्य चिकित्सक डॉ. एस.जे. आचार्य, डॉ. एस. देशमुख, डॉ. अभिजित ढाले, डॉ. संजय कोलते, डॉ. मनीष बनवानी, डॉ. इरटवार, डॉ. अमोल बावणे, डॉ. हेमंत देशपांडे, डॉ. सचिन डायगव्हाणे यांचा सहभाग होता. यावेळी राबविण्यात आलेल्या ग्रीन कॉरीडॉर मोहिमेसाठी संस्थेचे विश्वस्त सागर मेघे, कुलगुरू डॉ. राजीव बोरले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी, पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस., विभागीय प्रत्यारोपण समितीच्या वीणा वाथोरे यांनी यासाठी विशेष यंत्रणा उपलब्ध करून दिली. तर वाहतूक निरीक्षक दत्तात्रय गुरव, सावंगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष शेगावकर, पोलीस उपनिरीक्षक मिलिंद पारडकर, रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप श्रीवास्तव, विशेष कार्य अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे, डॉ. महाकाळकर, गणेश खारोडे, प्रशासकीय अधिकारी राजेश सव्वालाखे, रुपाली नाईक, अहमिंद्र जैन, आदित्य भार्गव, परिचारिका निलम खोंडे, सुरक्षा अधिकारी खैरे व चमूने महत्त्वपूर्ण सहकार्य केले.
सावंगीच्या रुग्णालयात चौथी शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 10:40 PM
मध्यभारतात अवयवदान शस्त्रक्रियांची मुहूर्तमेढ करणाऱ्या दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थेच्या सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात मंगळवारी चौथ्यांदा अवयवदानाची प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली आहे.
ठळक मुद्देलिव्हर, मूत्रपिंड प्रत्यारोपण : आर्वी तालुक्यातील धनोडीच्या युवकाचा मृत्यू