लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांना सोयाबीनच्या बोगस बियाण्यांची विक्री केल्याप्रकरणी हिंगणघाट पंचायत समितीतील कृषी अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून ईगल सिड्स बायोटेक लिमिटेडवर हिंगणघाट पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ४२० सह बियाणे कायदा १९६६ कलम ६ बी, ७ बी बियाणे नियम १९६८ चे कलम ३४ ए (२) अन्वये गुन्ह्याची नोंद घेण्यात आली आहे. बोगस बियाण्यांची विक्री करणाऱ्या कंपनीविरुद्ध कृषी विभागाने केलेल्या फौजदारी कारवाईमुळे इतर बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यांचे धाबे दणाणले आहे.प्राप्त माहितीनुसार, हिंगणघाट तालुक्यातील शीतल विठ्ठल चौधरी, रा. गोविंदपूर या शेतकऱ्यासह इतर पाच शेतकऱ्यांनी एकूण २४.२० हे. क्षेत्रावर १० जून ते १३ जून या कालावधीत ईगल कंपनीच्या सोयाबीन बियाण्यांची पेरणी केली. परंतु, ईगल इक्सलंट प्लस हे सोयाबीन बियाणे अंकुरले नाही. या प्र्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी बियाणे कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी १९ जूनला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करून शेतकरी चौधरी यांनी केली.सदर तक्रार प्राप्त होताच २३ जूनला हिंगणघाटचे उपविभागीय कृषी अधिकारी एन. एन. घोडमारे, तालुका कृषी अधिकारी आर. बी. गायकवाड, पं.स.चे कृषी अधिकारी एम. एस. डेहनकर, मंडळ कृषी अधिकारी एस. डी. सुतार, आर. एस. गाडगे आदींनी तक्रारकर्त्या शेतकºयाचे शेत गाठून पाहणी केली. शिवाय बियाण्यांचे काही नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले. प्रयोगशाळेचा अहवाल ईगल कंपनीच्या विरोधात आल्यावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे व प्रभारी जिल्हा कृषी अधिकारी संजय बमनोटे यांच्या मार्गदर्शनात सदर कंपनीवर फौजदारी करवाई करण्यात आली आहे. असे असले तरी नुकसानग्रस्त शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.उगवण क्षमता केवळ १३ टक्केचकृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार ७० टक्क्यांपेक्षा जास्त उगवण क्षमता असल्यास एकरी २६ किलो सोयाबीन बियाणे पेरणीसाठी पुरेसे असते. मात्र, शेतकऱ्याने एकरी ३० किलो बियाणे पेरणी करून सुद्धा एका चौरस मध्ये सरासरी ३२ ते ३३ रोपे उगवणे आवश्यक असताना केवळ ४ रोपे एका चौरस मिटरमध्ये उगवल्याचे निदर्शनास आले म्हणजे कंपनीच्या सोयाबीन बियाणे वाणाची केवळ १३ टक्के उगवण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.मंत्र्याच्या दौऱ्यातून शेत वगळल्याचा आरोपहिंगणघाट तालुक्यात गोविंदपूर येथील शेतकरी शीतल विठ्ठल चौधरी यांच्या शेतातील ६० एकरातील ईगल कंपनीचे बियाणे उगवले नाही. कृषी मंत्र्यांनी सोमवारी दौरा आयोजित केला आहे. मात्र या दौऱ्यात गोविंदपूर वगळण्यात आल्याचा आरोप शेतकरी चौधरी व शिवसेनेचे नेते तुषार देवढे यांनी केला आहे.
‘ईगल सिड्स बायोटेक’विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2020 5:00 AM
हिंगणघाट पंचायत समितीतील कृषी अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून ईगल सिड्स बायोटेक लिमिटेडवर हिंगणघाट पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ४२० सह बियाणे कायदा १९६६ कलम ६ बी, ७ बी बियाणे नियम १९६८ चे कलम ३४ ए (२) अन्वये गुन्ह्याची नोंद घेण्यात आली आहे. बोगस बियाण्यांची विक्री करणाऱ्या कंपनीविरुद्ध कृषी विभागाने केलेल्या फौजदारी कारवाईमुळे इतर बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यांचे धाबे दणाणले आहे.
ठळक मुद्देपं.स. कृषी अधिकाऱ्यांची तक्रार । सोयाबीनच्या बोगस बियाण्यांची विक्री भोवली