ओळखपत्राच्या नावावर अनेकांना घातला २०० रुपयांचा गंडाअल्लीपूर : येथील ग्रामपंचायतीच्या कार्यालयात वर्षभरापूर्वी डिग्निटी फाउंडेशन, मुंबई व सेनॉर सिटीझन सेवा समितीकडून ज्येष्ठ नागरिक सुविधा केंद्र सुरू केले होते. या केंद्रातून गावातील ज्येष्ठ नागरिकांकडून ओळखपत्राच्या नावावर २०० रुपये गोळा करण्यात आले. याला एक वर्षाचा कालावधी झाला असून नागरिकांना कुठलेही ओळखपत्र मिळाले नसल्याने यात ज्येष्ठांची फसवणूक झाल्याची गावात चर्चा आहे. या संदर्भात ग्रामपंचायतीला विचारणा केली असता त्यांच्याकडूनही या संदर्भात हात वर करण्यात येत आहे. केवळ या संस्थेचे कार्यालय थाटण्याकरिता जागा दिल्याचे सांगण्यात येत आहे. संस्थेच्या इतर व्यवहाराशी आपला कुठलाही संबंध नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. या ओळखपत्राबाबतही त्यांनी हातवर केल आहे. यामुळे गावातील नागरिकांना या संस्थेने गंडा घातल्याची ओरड सुरू झाली आहे.येथील ग्रामपंचायत कार्यालयात १४ आॅगस्ट २०१५ दरम्यान १५ दिवस ज्येष्ठ नागरिक सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रातून सेनॉर सिटीझन सेवा समिती ज्याचा र.नं. पावती नुसार महा- १०५/०८ एफ १२७२८ बॉम्बे व डिग्निटी फाउंडेशन मुंबईच्यावतीने ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र देण्यात येणार होते. याकरिता रक्कम घेवून आज वर्ष लोटले तरी कुठलेही कार्ड नागरिकांना मिळाले नाही. असा प्रकार केवळ अल्लीपूरच नाही तर हिंगणघाट तालुक्यातील बऱ्याच ग्रा.पं. मध्ये असे सेंटर थाटून लाखो रुपये रक्कम गोळा करून या कंपनीने पोबारा केल्याचे बोलले जात आहे. असा प्रकार संपूर्ण जिल्ह्यातही झाल्याचे नाकारता येत नाही. यामुळे वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.(वार्ताहर) आम्हाला या समिती व केंद्राबद्दल कुठलीही माहिती नसून त्यांनी जागा मागितली होती. त्यामुळे त्यांना जागा उपलब्ध करून दिली. त्यांच्या कुठल्याही व्यवहाराशी ग्रामपंचायतीचा संबंध नाही. - ए.व्ही. गव्हाळे, ग्रामविकास अधिकारी, अल्लीपूर
ज्येष्ठ नागरिक केंद्रातून फसवणूक
By admin | Published: September 17, 2016 2:23 AM