आर्वीतील थरार : अतिक्रमणाच्या वादातून घडला प्रकार आर्वी : आधी भाजपा कार्यकर्त्यांचे अतिक्रमण काढा, नंतर आमचे अतिक्रमण असेल तर ते काढतो, अशी मागणी करणाऱ्या नागरिकावर भाजपा कार्यकर्त्याने तलवारीने हल्ला केला. यात सदर युवक जखमी झाला. हा थरार जनतानगर येथे शुक्रवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास न.प. अध्यक्षांच्या समोरच घडला. वसंता ढोरे व पप्पू उर्फ धर्मराज ढोरे, अशी तलवारबाज भाजप कार्यकर्त्यांची तर सचिन पारधी, असे जखमी युवकाचे नाव आहे. नगराध्यक्ष प्रा. प्रशांत सव्वालाखे हे शुक्रवारी सकाळी ७ वाजता नेहमीप्रमाणे शहरात फेरफटका मारत होते. जनतानगर येथे पोहोचले असता फरहाना बेगम यांच्या घरासमोर अतिक्रमण काढण्यावरून वाद सुरू असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यामुळे नगराध्यक्षांनी तेथे थांबून फरहाना बेगम तसेच कार्यकर्ते ढोरे यांना समजाविण्याचा प्रयत्न केला; पण तो निष्फळ ठरला. पक्षपात न करता सर्वांचे अतिक्रमण काढा. आमचे अतिक्रमण असल्यास ते आम्ही काढू, अशी मागणी होत आहे. यावरूनच फरहाना बेग व भाजप कार्यकर्ते वसंत तसेच पप्पू उर्फ धर्मराज ढोेरे यांच्यात वाद सुरू होता. हा वाद विकोपाला जाऊन वसंत व धर्मराज ढोरे फरहाना यांच्यावर धावून गेले. दरम्यान, सचिन पारधी या युवकाने त्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला. ही बाब न रूचल्याने ढोरे यांनी घरातून तलवार आणून सचिनवर वार केला. यात सचिन पारधीच्या दंडाला व पोटाला मार लागला असून तो जबर जखमी झाले. त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी सहायक फौजदार अभिमान भुरे यांनी सचिन पारधी यांच्या बयाणावरून वसंत व धर्मराज ढोरे यांच्याविरूद्ध भादंविच्या कलम ३०७, ३४ व आर्म अॅक्टच्या कलम ४, २५ अन्वये गुन्हा दाखल केला. यातील धर्मराज ढोरे याला अटक करण्यात आली आहे. पूढील तपास ठाणेदार अशोक चौधरी यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.(तालुका/शहर प्रतिनिधी) मध्यस्थीलाच केली मारहाण अतिक्रमण हटाव मोहिमेत भेदभाव होत असल्याचा आरोप नागरिक करीत आहे. यामुळेच जनतानगर येथे नागरिकांनी आधी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचे अतिक्रमण काढा व नंतर आम्ही काढू, असा हेका धरला आहे. यातूनच महिलेशी वाद झाला. यात मध्यस्थी करण्यास गेलेल्या युवकालाच भाजप कार्यकर्त्याकडून तलवारीने मारहाण करण्यात आली. नेहमीप्रमाणे सकाळी शहरात फेरफटका मारत असताना जनतानगरमध्ये अतिक्रमण काढण्यावरून वाद सुरू होता. मी समजाविण्याचा प्रयत्न केला. या व्यतिरिक्त त्याच्याशी माझा काही संबंध नाही. - प्रशांत सव्वालाखे, नगराध्यक्ष, आर्वी.
नगराध्यक्षासमक्ष भाजप कार्यकर्त्यांची तलवारबाजी
By admin | Published: January 21, 2017 12:48 AM