लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जागेचे पट्टे व आवास योजनेचा लाभ देण्यासह अन्य मागण्यांसाठी अतिक्रमणधारकांनी युवा परिवर्तन की आवाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निहाल पांडे यांच्या नेतृत्वात शनिवार ५ डिसेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. यावेळी मागण्यांचे निवेदन प्रशासनाला दिले.अतिक्रमणधारकांना कायमस्वरूपी मोफत पट्टे मिळावे याकरिता युवा परिवर्तनने वर्धा ते नागपूर अशी ८५ किलोमीटर पदयात्रा केली. त्यानंतर नागपूर येथे अधिवेशनावर मोर्चा काढला. सेवाग्राम ते दिल्ली अशी १३५० किलोमीटर सायकलयात्रा केली. २०११ च्या सर्व अतिक्रमणधारकांना ५०० चौरस फूट जागा राज्य शासन देणार असल्याचे निर्णयात नमूद आहे. मात्र, तीन ते चार महिने लोटूनसुद्धा निर्णयाची अंमलबजावणी नाही. नागरिक ग्रामपंचायतीमध्ये जातात तेव्हा त्यांची दिशाभूल केली जाते. शासन निर्णयात अद्याप वनविभागाच्या जागेचा उल्लेख नाही. यामुळे जे नागरिक ४० वर्षांपासून वनविभागाच्या जागेवर राहत आहेत. त्यांना अतिक्रमण काढण्याविषयी नोटीस बजावल्या जात आहेत. प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून अतिक्रमणधारकांना पक्की करपावती नमुना आठ अ, सात-बारा मालकी हक्क देण्यास लागणारे पुरावे त्वरित देण्यात यावे, अतिक्रमणधारकांच्या जमिनीचा महसूल आणि गावठाणामध्ये समावेश करावा, अतिक्रमणधारकांना घरपट्टे देण्याची प्रक्रिया पायलट प्रोजेक्ट अंतर्गत सुरू करण्याचे आश्वासन पाळावे, आधारकार्ड, इमला करपावती आणि रेशनकार्डच्या आधारावर घरपट्टे दिले जावे, जिल्हा झोपडपट्टीमुक्त घोषित करावा, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. सदर मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार युवा परिवर्तन की आवाज या सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह अतिक्रमणधारकांनी केला आहे.
जागेच्या पट्ट्यासाठी बेमुदत उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2019 9:36 PM
जागेचे पट्टे व आवास योजनेचा लाभ देण्यासह अन्य मागण्यांसाठी अतिक्रमणधारकांनी युवा परिवर्तन की आवाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निहाल पांडे यांच्या नेतृत्वात शनिवार ५ डिसेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बेमुदत उपोषणाला सुरुवात केली.
ठळक मुद्देयुवा परिवर्तनचे आंदोलन : अतिक्रमणधारकांची आरपारची लढाई