लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : आरक्षणाला विरोध करीत ‘सेव्ह मेरीट सेव्ह नेशन’ या मागणीसाठी गुरूवारी हिंगणघाट शहरात महामोर्चा काढण्यात आला. यात विविध जाती-धर्माचे महिला-पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.आरक्षणाच्या नावाखाली होत असलेल्या सुलतानी अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी या मोर्चात तरुण, तरुणी, महिला-पुरुषांनी रस्त्यावर उतरून आपला रोष व्यक्त केला. दुपारी ४ वा येथील गोकुलधाम मैदानावरून या मोर्चाची सुरुवात झाली. शिस्तबद्ध रित्या मोर्चाने शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण केले. मोर्चाने तुकडोजी पुतळा, कारंजा चौक, मोहता चौक, सुभाष चौक, विठोबा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, लक्ष्मी टॉकीज मार्गे उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी शासनाच्या नावाने लिहिलेले एक पत्र उपविभागीय महसूल अधिकारी चंद्रभान खंडाईत यांना सादर करण्यात आले. सरकार गठ्ठा मतांच्या लोभाने गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय करीत असल्याचा आरोप करीत सरकार उच्च न्यायालयाने दिलेले आदेशानुसार ही काम न करता ते आदेश निरस्त करीत आहेत. यामुळे जे या देशाचे धन आणि वैभव आहे ते निराश होऊन परदेशात जात आहे. यात या देशाचे फार मोठे नुकसान होत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. महामोर्चात मराठी ब्राह्मण सभा, माहेश्वरी पंचायत, श्वेतांबर जैन समाज संघटना, गुजराती समाज, सिंधी समाज, दिगंबर जैन समाज संघटना, पंजाबी समाज, बोहरा समाज, खोजा समाज, उत्तर भारतीय ब्राह्मण समाज, अग्रवाल समाज, मुस्लिम समाज, इंडियन मेडिकल असोसिएशन, आर्य वैश्य संघटन, कापड व्यापारी आदी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. मोर्चात सहभागी झालेल्यांना नागपूर येथील डॉ. अनिल लददड यांनी मार्गदर्शन केले. मोर्चात गोकुलदास राठी, माजी आमदार अशोक शिंदे, माजी आमदार राजू तिमांडे, अॅड. सुधीर कोठारी, गिरीधर राठी, राजाभाऊ मंडमवार, डॉ. निर्मेश कोठारी, डॉ. प्रकाश लाहोटी, डॉ. राहुल मरोठी, डॉ. अजय देशपांडे, डॉ. उर्मिला देशपांडे, बिपीन पटेल, अॅड. हरिष पटेल, मनोज रुपारेल, विजय बाकरे, हाजी रफिक मोहम्मद, शेख सरफू, प्यारू कुरेशी, हसन अली, संजय देशपांडे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला-पुरुष आणि युवक-युवती सहभागी झाले होते. मोर्चाच्या यशस्वीतेसाठी डॉ. सीमा मानधनिया, डॉ. दिलीप जोबनपुत्रा, डॉ. मानधनिया, जयप्रकाश सारडा, नाना खापरे आदींनी सहकार्य केले. मोर्चातील नागरिकांसाठी अॅड. सुधीर कोठारी यांच्यातर्फे मोहता चौकात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होती.
आरक्षणाच्या विरोधात मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2019 9:31 PM
आरक्षणाला विरोध करीत ‘सेव्ह मेरीट सेव्ह नेशन’ या मागणीसाठी गुरूवारी हिंगणघाट शहरात महामोर्चा काढण्यात आला. यात विविध जाती-धर्माचे महिला-पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
ठळक मुद्देहिंगणघाट दणाणले : ‘सेव्ह मेरिट सेव्ह नेशन’ची मागणी