वर्धा, दि. 9- जिल्ह्यातील आदिवासी गोवारी समाज बांधवांनी बुधवारी स्थानिक झाशी राणी चौकात आपल्या विविध मागण्यांसाठी एकदिवसीय ढोल-डफ धरणं आंदोलन केलं. आंदोलनादरम्यान विविध मागण्यांचं निवेदन आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलं.
अनुसूचित जमातीच्या सूचीमधील गोंड गोवारी या शब्दामध्ये गोंड नंतर ‘,’ असा अल्पविराम टाकून गोंड, गोवारी अशा दुरूस्तीची शिफारस राज्य सरकारने केंद्र सरकारकडे करावी. गोवारी समाज बांधवांना विविध सवलती देण्यात याव्या. गोवारी जमातीला महाराष्ट्र शासनाने परिपत्रक काढून गोंड गोवारी अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र व वैद्यता प्रमाणपत्र द्यावे, गोवारी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापन करावे, अशा मागण्या त्यांनी आजा आंदोलनच्या माध्यमातून केल्या. गोवारी व गोंड गोवारीमध्ये कोणतेही संशोधन झाले नाही. ज्यामुळे संचालक आदिवासी व संशोधन प्रशिक्षण पुणे हे वेळोवेळी आदिवासी गोवारी जमात आदिवासी नसल्याचे चूकीचे पुरावे सादर करून शासनाची दिशाभूल करीत आहे. आदिवासी गोवारी जमात स्वातंत्र्य पूर्व काळापासूनच आदिवासी असल्याचे अनेक पुरावे असून त्यांना न्याय देण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन आदिवासी गोवारी समाज संघटनेच्या नेतृत्त्वात करण्यात आले. सदर आंदोलनात भास्कर राऊत, किशोर चौधरी, कैलास राऊत, सुरेंद्र राऊत सोनू नेहारे, रवी वाघाडे, विक्रम सहारे, दिनेश राऊत, हरिष नेवारे यांच्यासह गोवारी समाजाचे महिला- पुरुष तसेच चिमुकले मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सादर केले पारंपारीक नृत्यआदिवासी गोवारी समाज संघटनेच्या नेतृत्त्वात स्थानिक झाशी राणी चौकात बुधवारी करण्यात आलेल्या एक दिवसीय ढोल-डफ धरणे आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांनी आपले पारंपारी नृत्य सादर केले. पारंपारीक नृत्याच्या माध्यमातून आदिवासी गोवारी समाज बांधवांनी आपला आवाज बुलंद केला.